पुणे : मुंबई-बंगळुरू महामार्गावर चांदणी चौकाजवळील डुक्कर खिंडीत रविवारी सकाळी मिनीबस व दोन दुचाकींत झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. चालकाचा ताबा सुटल्याने मिनीबसने दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. अपघातात चार जण ठार झाले.सारंग तानाजी काळे (२२, रा. वाघजाईनगर, कात्रज), शंकर तानाजी दिडकर (३५), चंद्रकांत बाळासाहेब जाधव (२२, दोघेही रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर) आणि विनोद कुबेर भारती (३५, रा. पाषाण) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी मिनीबस चालक सहदेव ज्ञानोबा शिंदे (३०, रा. कारगीर सोसायटी, वारजे) यास अटक केली आहे. मिनीबस डुक्कर खिंडीत आल्यानंतर थोडे पुढे जाताच चालकाचे नियंत्रण सुटले. बस उलटून तिची दोन दुचाकींना धडक बसली. दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाला. मिनीबसमध्ये १० ते १५ प्रवासी होते. ते काचा फोडून बाहेर आले. काही जखमी झाले. अपघातानंतर बसचालक पळून गेला. (प्रतिनिधी)खालापूर : मुंबई - पुणे एक्स्प्रेस-वेवर बोरघाट अंडा पॉइंटजवळ खासगी मिनीबसला अपघात झाला. रविवारी दुपारी झालेल्या या अपघातात सात प्रवासी गंभीर जखमी झाले. मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी मिनीबसचा ब्रेक अंडा पॉइंटजवळ फेल झाला आणि ती पलटी झाली. बसमध्ये एकूण २२ प्रवासी होते. त्यापैकी आदित्य दिवलकर, प्रसन्न दिवलकर, प्राची मानगावकर (रा. चिंचवड), अंजली मिसाळ (पिंपरी), विद्या मिसाळ, रामदास चांबले, मेहबूब मुजावर (पुणे) असे सात जण गंभीर जखमी झाले. उर्वरित प्रवासी किरकोळ जखमी झालेत. अपघात घडताच बोरघाटात सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम जोशी, पोलीस कर्मचारी प्रशांत बोंबे यांच्या पथकाने तातडीने जखमींना निगडी येथील खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केले.
मिनीबस-दुचाकी अपघातात ४ ठार
By admin | Published: November 16, 2015 3:13 AM