मोहोळ (सोलापूर) : वनवासाला निघालेल्या रामभक्तांच्या दिंडीत टेम्पो घुसल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाला़ ही घटना सोमवारी पहाटे ५़१५च्या सुमारास सोलापूर-पुणे महामार्गावरील मोहोळपासून दीड किलोमीटर अंतरावर घडली़ मृत्युमुखी पडलेले सर्वजण वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथील रहिवासी असून मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे़वडाळा गावात सध्या नित्यनेमाने पहाटेची रामटाळी सुरू आहे. २ एप्रिलला होणाऱ्या लक्ष्मणशक्ती महोत्सवाची तयारी जोरात सुरू आहे. परंपरेनुसार रामायण कालावधीत रामटाळीमध्ये सहभागी झालेले ३१ रामभक्त १४ दिवसांच्या वनवासासाठी रविवारी बाहेर पडले होते. त्यांची दिंडी रात्री लांबोटी येथे एका वस्तीवर मुक्काम करून २१ रोजी पहाटे ४ वाजता पंढरपूरकडे मार्गस्थ झाली़ दिंडी मोहोळपासून दीड किलोमीटरवर आली असता सोलापूरहून मोहोळच्या दिशेने येणारा टेम्पो दिंडीत घुसला़ त्यात दत्तात्रय विठोबा शेंडगे (वय ५५), विलास अंबादास साठे (वय ५०), भाऊसाहेब नारायण जाधव (४५), जिजाबाई सुबराव गाडे (वय ५०) जागीच ठार झाले़ अपघातानंतर टेम्पो तसाच भरधाव निघून गेला. सोमवारी पहाटे रामटाळीवेळीच अपघाताची बातमी समजली आणि वडाळा गावावर शोककळा पसरली. चौघा मृतांवर एकत्रित अंत्यविधी करण्यात आला.अपघाताच्या ठिकाणी माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड यांनी भेट दिली. अज्ञात टेम्पोचालकाविरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़ (प्रतिनिधी)
दिंडीत टेम्पो घुसल्याने ४ ठार
By admin | Published: March 22, 2016 4:15 AM