आरती बोरकर हत्या प्रकरण : तिघांचा ६ पर्यंत पीसीआरनागपूर : लालगंज येथील आरती अनिल बोरकर हिच्या खुनासाठी मारेकऱ्यांना चार लाखांची सुपारी देण्यात आली होती, अशी धक्कादायक माहिती माहिती पुढे आली आहे. दरम्यान या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. आज त्यांना अवकाशकालीन प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्याच्या न्यायालयात हजर करून त्यांचा ६ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आला. विशाल ऊर्फ सोनू मोहनदास खरे (२०) रा. स्विपर कॉलनी, विक्की राजू खरे (२४) रा. इमामवाडा आणि सुरेंद्र राधेशाम केसरवानी (४९) राऊत चौक, अशी या आरोपींची नावे आहेत. चौथा आरोपी आकाश दोरखंडे हा जमावाच्या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर मेयो इस्पितळात पोलिसांच्या देखरेखीत उपचार सुरू आहेत. मध्य नागपूरच्या शिवसेनेच्या माजी पदाधिकारी आरती बोरकर ह्यांनी रॉकेलचा काळाबाजार करणाऱ्या रवि खंते आणि भेसळयुक्त मिरची पावडरचा धंदा करणाऱ्या केशरवाणीविरुद्ध तक्रारी करून दोघांचेही धंदे बंद पाडले होते. त्यामुळे खंते आणि केशरवाणीने आरतीला रस्त्यातून कायमचे हटविण्याची योजना आखली होती. यासाठी त्यांनी गुंडांची जुळवाजुळव करून त्यांना चार लाखांची सुपारी दिली होती. त्यापैकी पहिला हप्ता आधीच देण्यात आला होता. उर्वरित तीन लाख काम झाल्यावर देण्याचे ठरले होते. शुक्रवारच्या रात्री आरती बोरकर आणि त्यांचे पती अनिल बोरकर विकास मोटघरेच्या घरासमोर बोलत उभे असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर सशस्त्र हल्ला केला होता. हल्ल्यात आरती बोरकर ह्या घटनास्थळीच ठार तर अनिल बोरकर गंभीर जखमी झाले होते. हल्लेखोरांपैकी आकाश दोरखंडे याला लोकांनी पकडून त्याची बेदम धुलाई केली होती. त्याच्यावर सध्या मेयो इस्पितळात उपचार सुरू असून चौकशीत त्याने ही सुपारी खुनाची माहिती उघड केली, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. या घटनेनंतर या भागातील संतप्त नागरिकांनी केशरवाणी याच्या घरावर जळता बोळा फेकून घर जाळण्याचा प्रयत्न केला होता. तूर्त या भागात तणावपूर्ण शांतता आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे हे करीत आहेत. (प्रतिनिधी)
खुनासाठी चार लाखांची सुपारी
By admin | Published: August 04, 2014 12:54 AM