शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या आदल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळानं शिवसैनिकांना आनंदाची बातमी दिली आहे. तसंच, विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणेकरांनाही खूश केलं आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. हा 'चौकार' सरकारला फायदेशीर ठरू शकतो.
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा विषय बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांत त्या संदर्भात वेगानं घडामोडी घडल्या. स्मारकासाठी महापौर निवासाची जागा पक्की झाली, महापौरांचा मुक्काम राणीच्या बागेत हलवण्यात आला. त्यानंतर, आता या कामासाठी १०० कोटींचा निधी एमएमआरडीएमार्फत उपलब्ध करून देण्यास राज्य सरकारने हिरवा कंदील दिला आहे. या निर्णयाद्वारे शिवसेनेला खूश करण्याचा प्रयत्न देवेंद्र सरकारने केल्याची कुजबूज आहे.
पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज या स्वायत्त संस्थेचे रूपांतर फर्ग्युसन युनिव्हर्सिटीमध्ये करण्यास मान्यता देण्याचा निर्णयही शिक्षण क्षेत्रात मोठा बदल घडवू शकतो.
राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय खालीलप्रमाणे....
१. दिव्यांग व्यक्तींच्या स्वावलंबनासाठी हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन व्हेईकल) मोफत उपलब्ध करण्याचा निर्णय.
२. बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी १०० कोटींचा निधी एमएमआरडीएमार्फत उपलब्ध करण्यास मंजुरी.
३. मुंबई शहरातील सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्र शासन पुरस्कृत महिला सुरक्षितता पुढाकार योजना राबविण्यास मान्यता.
४. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज या स्वायत्त संस्थेचे रुपांतर फर्ग्युसन युनिव्हर्सिटीमध्ये करण्यास मान्यता.