मुंबई : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले विक्रम काळे, सुधाकर अडबाले, ज्ञानेश्वर म्हात्रे, सत्यजित तांबे आणि धीरज लिंगाडे यांनी बुधवारी विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांना सदस्यत्वाची शपथ दिली.
नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले सत्यजित तांबे यांनी शपथ घेण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांची नावे घेतली. तसेच आजोबा सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांना वंदन करून तांबे यांनी शपथ घेतली.
विधिमंडळात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शिक्षक मतदारसंघातून तीन तर पदवीधर मतदारसंघातून दोन विधान परिषद सदस्य निवडून आले आहेत. डॉ. गोऱ्हे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.