कांता हाबळे,नेरळ- कर्जत तालुक्यातील महत्त्वाच्या कळंब-पाषाणे या आठ किलोमीटर रस्त्याचे काम दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले होते. त्यानंतर हा रस्ता अनेक वेळा चर्चेत राहिला. याच रस्त्यावरील माले ते फराटपाडा, आर्ढे, या भागात रस्त्याचे काम न केल्याने पावसाळ्यात या भागात मोठमोठे खड्डे पडले; परंतु अद्यापही या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले नसल्याने त्याचा त्रास माले व फराटपाडा, आर्ढे येथील विद्यार्थी, स्थानिक ग्रामस्थ व प्रवाशांना सहन करावा लागत आहे. वेळोवेळी बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणूनही बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. कर्जत तालुक्यातील कळंब-पाषाणे हा आठ किमीचा रस्ता असून, या रस्त्याच्या मजबुतीकरण आणि डांबरीकरणाच्या कामाला दोन वर्षांपूर्वी चार कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. टप्प्याटप्प्याने या रस्त्यावरील काही भागाचे काम करण्यात आले आहे. रस्त्याचे काम करताना हा रस्ता निकृष्ट दर्जाचा होता. त्यावेळी या कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या दक्षता समिती व ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले होते. त्यानंतर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्ता चांगल्या दर्जाचा करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर पुन्हा कामाला सुरु वात झाली; परंतु याच रस्त्यावरील माले, आर्ढे, फराटपाडा गावांत याच रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारे बांधून रस्ता तयार करण्यात येणार होता; परंतु अद्याप या रस्त्यावर गटाराचे कामही सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे काही भागांत सांडपाणी रस्त्यावर येऊन दुर्गंधी पसरत असल्याने त्याचा त्रास स्थानिक नागरिकांना होत आहे. याकडे बांधकाम विभागाने डोळेझाक केली आहे. अनेकवेळा ग्रामस्थांनी बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणूनही या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले नाही.त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी तरी आता या रस्त्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.दोन वर्षांपासून आर्ढे, माले गावांत हे काम रखडल्याने माले गावातून रस्त्यावर गटारगंगा वाहत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात परिसरात दुर्गंधी पसरली आहे, असे असताना बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. तरी बांधकाम विभागाने या रस्त्यावरील काम लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. कळंब-पाषाणे रस्त्याचे काम चिंतामणी प्रोजेक्टने घेतले आहे. हे काम थांबल्याने आम्ही त्यांच्या ठेकेदाराला नोटीस दिली आहे. त्यांनी काम सुरू केले नाही तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करू, दंडात्मक कारवाई होऊनही त्यांनी हे काम न केल्यास आम्ही त्यांची सोसायटी टर्मिनेट करून दुसऱ्या सोसायटीकडून काम करून घेणार आहोत.- एस. एम. धिलपे, उपअभियंता सार्वजनिक.या रस्त्यासंदर्भात लेखी पत्रव्यवहार केला नाही; परंतु आम्ही अनेकवेळा बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला; परंतु या रस्त्याचे कामथांबले आहे. याचे उत्तर आम्हाला मिळाले नाही. - जनार्दन म्हसकर, सचिव, दक्षता समिती.कळंब-पाषाणे रस्त्यावरील माले आणि आर्ढे भागात हा रस्ता रखडला आहे. यासाठी आम्ही अनेक वेळा बांधकाम विभागाने नेमलेल्या ठेकेदार आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊनही हे काम सुरू करण्यात आले नाही, हे काम आज सुरू करतो, दोन दिवसांत सुरू होईल, असे उत्तर येत आहे. त्यामुळे अशा कामचुकार ठेकेदारांवर व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. - अपर्णा भुंडेरे, सरपंच, सलोख
चार कोटींचा कळंब-पाषाणे रस्ता दोन वर्षांपासून अर्धवट
By admin | Published: April 03, 2017 3:43 AM