ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. २१ : जिन्सी परिसरतील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ८ वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी जिन्सी पोलिसांनी यापूर्वी दोन शिक्षकांना अटक केलेली आहे. या प्रकरणात बुधवारी ४ रिक्षाचालकांना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने आरोपींना २६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.
मोहमंद हनीफ (४२, रा. बायजीपुरा), शेख रफिक (३६, रा. बिस्मिल्ला कॉलनी, नारेगाव), आजम अलीम खान (२९, रा. नवाबपुरा), मोजम खान युसूफ खान पठाण (४०, रा. रहेमानिया कॉलनी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या सामूहिक अत्याचाराबाबत चिमुकलीने माजी नगरसेविका असलेल्या तिच्या आजीला हा घृणास्पद प्रकार सांगितला. त्यानंतर आजीने दिलेल्या तक्रारीवरून जिन्सी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिक्षक अहेमद खान आणि संगणक शिक्षक अहेमद खान अमीन खान हे अटकेतील आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. पीडितेचा दोन दिवसांपूर्वी तपास अधिकाऱ्यांनी ईन कॅमेरा जबाब नोंदविला. या जबाबात तिने शाळेतील विद्यार्थ्यांची नियमित ने-आण करणारे रिक्षाचालक मोहंमद हनीफ, शेख रफिक, आजम अलीम खान यांनीही अत्याचार केल्याचे सांगितले. या रिक्षाचालकांना २० सप्टेंबर रोजी रात्री अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता सहायक सरकारी वकील सुदेश शिरसाठ यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने आरोपींना २६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
चॉकलेटच्या आमिषाने अत्याचारअटक करण्यात आलेल्यांपैकी एक रिक्षाचालक मुलीला नियमित घर ते शाळा अशी ने-आण करत होता. आरोपी तिला चॉक लेट खाण्यास देत असे. आरोपीने पीडितेच्या निरागसतेचा गैरफायदा घेतला आणि अन्य रिक्षाचालकांच्या मदतीने बेगमपुरा येथील एका खोलीत पीडितेला नेऊन तेथे तिला गुंगीचे चॉकलेट खाऊ घालून अत्याचार केल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडिता बेशुद्ध झाल्यानंतर आरोपींनी तिच्यावर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे.