मुंबई : रेल्वे भरतीसाठी बनावट लेटरहेड घेऊन आलेल्या चार जणांना कोकण रेल्वेच्या अधिका-यानी पकडले आहे. या चारही जणांना आरपीएफने (रेल्वे पोलीस दल) ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू केली आहे. सध्या रेल्वेत गँगमन, किमॅनसारख्या विविध पदांसाठी भरती होत आहे. कोकण रेल्वेवरही होणाऱ्या या भरतीसाठी अनेक उमेदवारांना कॉल लेटर पाठवण्यात आले आहेत. सध्या उमेदवारांच्या वैद्यकीय चाचणीची प्रक्रिया पार पाडली जात आहे. यासाठी कोकण रेल्वेच्या नवी मुंबई कार्यालयात अनेक उमेदवार भरती प्रक्रियेसाठी येत आहेत. सोमवारीही चार जण आले असता यातील प्रत्येकाकडे कोकण रेल्वेचे लेटरहेड होते. रंगराजन नावाच्या चीफ पर्सनल आॅफिसरची सही असलेले लेटरहेड चौघांनी सादर केले. यात कोकण रेल्वेने भरतीसाठी बोलावल्याचे नमूद केले होते. असे लेटरहेड घेऊन कोकण रेल्वेने कुठल्याही उमेदवाराला स्वतंत्ररीत्या बोलावले नसल्याचे समोर आल्यानंतर त्यांना पकडण्यात आले आणि त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर भरतीसाठी एका इसमाने हे लेटरहेड दिल्याचे सांगण्यात आल्यानंतर त्यांना चौकशीसाठी आरपीएफच्या ताब्यात दिले. या चौघांची सखोल चौकशी सुरू असल्याचे कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंगे यांनी सांगितले. यात भरती प्रक्रियेचे बनावट लेटरहेड बनवून उमेदवारांकडून पैसे उकळले जात असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशा प्रकारे भरती प्रक्रिया होत नसून भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे. भरतीसाठी आलेले हे चौघेही महाराष्ट्रातीलच असल्याचे सांगितले जात आहे. त्याबाबत कोकण रेल्वेकडून अधिक माहिती मात्र समजू शकली नाही. (प्रतिनिधी)
बनावट लेटरहेडसह भरतीस आलेले चौघे ताब्यात
By admin | Published: November 05, 2014 4:39 AM