ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 27 - नाशिकमध्ये दोन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये दोन अल्पवयीन मुलांसहीत एकूण चार जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. पहिल्या घटनेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकहून स्थानिक इंजिनिअरिंग कॉलेजचे काही विद्यार्थी रविवारी (26 जून) संध्याकाळी त्र्यंबक घोटी रस्त्यावरील पहिणे वाडी गावात सहलीसाठी आले होते. यातील दोन विद्यार्थ्यांचा तलावात पोहोताना बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संग्राम सिरसाठ (वय 23) आणि कौस्तुभ भिंगारदिवे (वय 26) अशी मृतांची नावं आहेत. यातील संग्राम हा गंगापूर रोड येथील निवासी होता तर कौस्तुभ अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी होती.
पोलीस अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, संग्राम आणि कौस्तुभ तलावात पोहोण्यासाठी उतरले, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने हे दोघंही बुडू लागले. या दुर्घटनेत दोघांचाही मृत्यू झाला. सहलीसाठी साधारणतः 5 ते 6 विद्यार्थी आले होते. पहिणे फाटा त्रिफुलीपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असेलल्या वळणात वाहने उभी करुन नदीपात्रात असलेल्या डोहाच्या शेजारी बसून सर्वजण पार्टी करत होते. त्यानंतर दोघं जण पोहोण्यासाठी डोहात उतरले असता, त्यातील एक जण बुडायला लागला. दुस-या वाचवण्याच्या प्रयत्नात तो देखील बुडू लागला.
आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील रहिवासी धावून आले. खडकवाडी येथील तरुणांनी या दोघांचे मृतदेह बाहेर काढले. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पंचनामा करुन त्यांचे मृतदेह तलावाबाहेर काढण्यात आल्यानंतर पोस्टमार्टेमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले व यानंतर नातेवाईकांना त्यांचे मृतदेह सोपवण्यात आले.
तर दुस-या दुर्घटनेत, नाशिकमधील मुखेड शिवारात राहणारे चंदू दाहिले (वय 14) आणि कार्तिक दाहिले (वय 12) हे सख्खे भाऊ आपल्या आईसोबत प्रवास करत असताना पिंपळगाव परिसरात आल्यानंतर दोघांचा तोल जाऊन तलावात पडले, ज्यात दोघांचाही बुडून मृत्यू झाला.