गोविंद इंगळे - निलंगा (लातूर)
अशांत इराकमध्ये निलंगा तालुक्यातील चौघे अडकले असून, त्यांना चार महिन्यांचे वेतनही मिळाले नसल्याने उपासमारीशी सामना करावा लागत आह़े
ज्ञानेश्वर प्रताप भोसले, नितीन सुभाष कांबळे , प्रमोद सोनवणो, बालाजी भोसले अशी त्यांची नावे आहेत़ इराकमध्ये चांगले वेतन मिळत़े त्यामुळे तुम्ही इराकला जा असे गावातील रसूल शेख याने सांगितल़े त्याच्या ओळखीवर एजंटाच्या आधारे या चौघांना इराकच्या बसराक या गावात पाठविण्यात आल़े तिथे या सर्वाना बांधकाम मजूर म्हणून काम देण्यात आले. महिन्याला 35 हजारांचा पगार ठरला. सुरुवातीचे दोन महिने वेतन मिळाल़े गेल्या चार महिन्यांपासून त्यांच्याकडून काम करुन घेण्यात येत असले तरी पैसे मात्र दिले जात नसल्याचा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केला. इराकमधील बंडामुळे या चौघांना राहण्याच्या ठिकाणावरुन बाहेरही पडता येत नाही़ त्यांचे जेवणही बंद झाल्याने उपासमार होत आह़े पिण्यासाठी चांगले पाणीही मिळत नसल्याचे ज्ञानेश्वर भोसले आणि नितीन कांबळे यांनी कुटुंबियांना दूरध्वनीवरुन सांगितले असल्याचे नातेवाईक म्हणाल़े या चौघांनी आपले पासपोर्ट काढलेल्या इराकमधील एजंटाशी संपर्क साधून आपले पासपोर्ट देण्याची मागणी केली असता त्याने प्रत्येकी एक हजार डॉलर्स देण्याची मागणी केली आह़े खाण्या- पिण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत तर इतके डॉलर्स द्यायचे कुठून अशी व्यथा भोसले, कांबळे यांनी दूरध्वनीवर व्यक्त केल्याचे नातेवाईकांनी सांगितले.