मिरज (जि. सांगली) : जादूटोणा करणाऱ्या टोळीला पकडून त्यांच्याकडून आर्थिक तडजोड केल्याच्या तक्रारीवरून मिरज पोलिस उपअधीक्षक धीरज पाटील यांच्या कार्यालयातील चार पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी तडकाफडकी निलंबित केले. हवालदार संजय रघुनाथ चव्हाण, पोलिस नाईक प्रशांत कोळी, सागर बबन आंबेवाडीकर व योगेश पाटील त्यांची नावे आहेत. चार दिवसांपूर्वी नरवाड (ता. मिरज) येथे तुकाराम पवार या शेतकऱ्याच्या शेतात मुंबईतील जादूटोणा करणारी टोळी अघोरी पूजा करीत होती. पोलीस उपअधीक्षक कार्यालयातील कर्मचारी योगेश पाटील व साथीदारांनी नरवाड येथे छापा टाकून एका महिलेसह सात जणांना ताब्यात घेतले. जादूटोणाविरोधी कायद्यान्वये या सर्वांवर गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्यांना एक दिवस डांबून ठेवले. आर्थिक तडजोडीनंतर जबाब नोंदवून त्यांची सुटका करण्यात आल्याची तक्रार आहे. जादूटोणा प्रकरणातून सुटका झालेल्या टोळीने याबाबत तक्रार केल्यानंतर पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी पोलीस उपअधीक्षक कार्यालयातील चौघांचे निलंबन करून त्यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले.या टोळीने पैशाच्या मागणीसाठी मोटारीसह दोन वाहने पोलीस ठाण्यात अडवून ठेवल्याची तक्रार केली होती. (वार्ताहर)
चार पोलीस निलंबित
By admin | Published: November 17, 2016 3:38 AM