नवी मुंबई : शासन कोकणातील जाणवली, अर्जुना, जगबुडी व गांधारी नद्यांचे पुनरुज्जीवन करणार असून याविषयी लवकरच अध्यादेश काढला जाईल. जलयुक्त शिवार प्रकल्पांच्या माध्यमातून राज्य पाणीटंचाईमुक्त करण्याचा संकल्प असून कोकण विभागामध्येही तब्बल २० हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड घेण्यात येत असल्याची माहिती जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी दिली आहे. कोकण भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये शिंदे यांनी जलयुक्त शिवार योजनेविषयी सविस्तर माहिती दिली.कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जाणवली, रत्नागिरीमधील अर्जुना व जगबुडी आणि रायगड जिल्ह्यातील गांधारी नदीचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे. कोकणात शेततळे देण्याबाबतही शासन विचार करत असून कोकण कृषी विद्यापीठाने दिलेला आराखडा तपासून याविषयी निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. राज्यात २०१५- १६ या आर्थिक वर्षामध्ये २ लाख १४ हजार २८६ कामे पूर्ण केली आहेत. १५ हजार ३०४ कामे प्रगतिपथावर आहेत. ही योजना राबविलेल्या गावांमध्ये ११ लाख ६१ हजार ६२६ टीएमसी इतकी पाणीसाठ्याची क्षमता निर्माण झाली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. २०१६- १७ वर्षातील ४३ हजार ५४५ कामे पूर्ण केली असून १७ हजार १२१ प्रगतिपथावर असल्याचे सांगितले.>१६० गावांचा पाणीप्रश्न सुटलाकोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख म्हणाले की, एकात्मिक पाणलोट क्षेत्रात २६८ पैकी २५१ कोटींची कामे पूर्ण झाली आहेत. या माध्यमातून १६० गावे पाण्याच्या दृष्टीने स्वयंपूर्ण झाली आहेत. शासनाच्या विविध योजनांमुळे विभागात २९ लाख हेक्टर पैकी ८ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आले आहे. आतापर्र्यंत ६०० हेक्टर क्षेत्रावर फळबागायत केली असून पुढील वर्षी नरेगाच्या माध्यमातून २० हजार हेक्टरपर्यंत हे क्षेत्र वाढविण्यात येणार आहे.
चार नद्यांचे पुनरुज्जीवन लवकरच करणार
By admin | Published: August 25, 2016 5:42 AM