परळी : पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याने औष्णिक विद्युत केंद्रातील पाचपैकी चार संच बंद पडले आहेत. त्यामुळे सोमवारी एकच संच चालू होता. यातून केवळ १९३ मेगावॅट वीजनिर्मीती झाल्याचे सूत्रांनी सांगितले.या विद्युत केंद्राला पाणी पुरवठा करणाऱ्या खडका (जि. परभणी) येथील धरणात पाण्याचा ठणठणाट झाल्याने सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास २१० मेगावॅट क्षमतेचा संच क्र. ५ हा बंद ठेवण्यात आला. २१० मेगावॅट क्षमतेचा संच क्र. ४ हा रविवारी सायंकाळी बंद करण्यात आला. तसेच २५० मेगावॅट क्षमतेचा संच क्र. ६ व २१० मेगावॅट क्षमतेचा संच क्र. ३ हे दोन संच पाण्याअभावी यापूर्वीच बंद ठेवण्यात आले आहेत. सोमवारी नवीन औष्णिक विद्युत केंद्रातील २५० मेगावॅट क्षमतेचा संच क्र. ७ हा एकमेव चालू होता, त्यातून सायंकाळी ५.३० च्या सुमारास १९३ मेगावॅट विजेचे उत्पादन चालू होते. परळी औष्णिक विद्युत केंद्रात ५ संच आहेत. या संचाची स्थापित क्षमता ११३० मेगावॅट आहे. पाण्याच्या समस्येमुळे ४ संच बंद ठेवावे लागल्याने ९३७ मेगावॅट एवढी तूट सोमवारी सायंकाळी निर्माण झाली. चालू असलेला एक संचही पाणीटंचाईमुळे बंद पडण्याची शक्यता आहे. या संदर्भात परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता आर.बी. गोहणे म्हणाले की, सोमवारी दुपारी २१० मेगावॅट क्षमतेचा संच क्र. ५ पाणी नसल्यामुळे बंद ठेवण्यात आला आहे. संच क्र. ४ हा रविवारी बंद करण्यात आला व संच क्र. ६ हा ११ दिवसापुर्वी बंद करण्यात आला. यापुर्वी संच क्र. ३ बंद केलेला आहे. खडका धरणात पाणीसाठा नसल्यामुळे हे संच बंद ठेवावे लागले. सोमवारी एक संच चालू होता, यातून विज निर्मिती उत्पादीत होत होती. (वार्ताहर)नागापूर धरणातून पाणी घ्यावे लागणारदोन वर्षांपूर्वीही परळी औष्णिक विद्युत केंद्रातील सर्वच संच काही दिवस पाण्याअभावी बंद ठेवावे लागले होते. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी शक्तिकुंज वसाहतीतील १६०० कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांनाही नागापूर धरणातून पाणी पुरवठा करावा लागला होता. पुन्हा आता तीच वेळ आली आहे.
परळी औष्णिक विद्युत केंद्रातील पाचपैकी चार संच बंद
By admin | Published: July 07, 2015 2:12 AM