ऑनलाइन लोकमतकोल्हापूर, दि. 27 : अंबाबाई मंदिर परिसरात व जुनाराजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राजरोस वेश्या व्यवसाय सुरु असलेल्या ताराबाई रोडवरील पंचगंगा यात्री निवासमध्ये कोल्हापूर पोलिसांनी छापा टाकून चार पिडीत युवतीची सुटका केली. यावेळी यात्री निवास मालक अरविंद विश्वास साळोखे (वय ५०, रा. रेसकोर्स नाका, संभाजीनगर), सुरेश उर्फ पप्पु पांडूरंग लाड (४५, रा. भेंडे गल्ली, महाद्वार रोड), यशवंत चंदर दबडे (४९, रा. मनपाडळे, ता. हातकणंगले) यांना अटक केली. पिडीत युवतीमध्ये दोघी नगरच्या आहेत.
पोलिसांनी सांगितले, कपीलेश्वर दरबार, ताराबाई रोडवरील पंचगंगा यात्री निवासमध्ये राजरोस वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती खबऱ्याने स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे पोलिस निरीक्षक दिनक मोहिते यांना दिली. त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक वैष्णवी पाटील, कॉन्स्टेबल ए. जी. काळे, जे. एस. खाडे, आर. व्ही. डोईफोडे, ए. एस. पाटील, पी. बी. काळे, एम. एस. घोडके, एस. एम. लाड, जे. ए. पाटील आदींना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार शुक्रवारी दूपारी बनावट गिऱ्हाईक पाठवून खात्री होताच छापा टाकून अटक केली.
यात्री निवास हे ह्यअंबाबाईह्ण मंदिरापासून हाकेच्या अंतरावर असल्याने याठिकाणी भाविक-पर्यटकांची नेहमी वर्दळ असते. अचानक पोलिसांचा छापा पडताच भाविक-पर्यंटक बिथरुन गेले. कारवाईनंतर याठिकाणी वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे समजताच त्यांचा धक्काच बसला. पिडीत युवतीमध्ये दोन नगरच्या तर दोन स्थानिक आहेत. त्यांची महिला सुधारगृहात रवानगी केली. तर यात्री निवास मालकासह तिघांना जुनाराजवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. अनेक वर्षापासून याठिकाणी वेश्या व्यवसाय सुरु होता. या परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. त्यांनी जुनाराजवाडा पोलिसांकडे तक्रार करुनही याकडे सोयीने दूर्लक्ष केले जात होते.