ऑनलाइन लोकमत
भिवंडी, दि. 20 - भिवंडी तालुक्यातील दापोडा गावाच्या हद्दीत प्लास्टिक दाण्यापासून मोती बनवण्याच्या कारखान्यात रविवारी लागलेल्या भीषण आगीत चार कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. याप्रकरणी मृतांच्या संतप्त नातेवाईकांनी कंपनी मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीसाठी नारपोली पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. जोपर्यंत मालक येत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आक्रमत पवित्रा मृतांच्या नातेवाईकांनी घेतला आहे. 24 तास उलटूनही मालकाला अटक न झाल्याने नातेवाईक संतापले आहे.
नेमकी काय आहे घटना?
दापोडा येथील हरिहर कंपाउंडमध्ये देढिया प्लास्टिक कंपनीत प्लास्टिक दाण्यापासून कृत्रिम मोती बनविण्याचा कारखाना आहे. त्यामध्ये सुमारे १५ ते १७ कामगार काम करीत होते. येथे मोती बनवण्यासाठी रसायनाचा वापर होतो. या रसायनांच्या साठ्यास शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे समजल्यानंतर कामगारांनी कारखान्याबाहेर धाव घेतली.
काही क्षणांतच रसायन व प्लास्टिकच्या दाण्याने पेट घेत आगीने रौद्ररूप धारण केले. चारही बाजूने आगीने कारखान्यास वेढल्याने चार कामगार बाहेरच पडू शकले नाहीत. त्यामुळे त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच पालिकेच्या अग्निशमन दलासह ठाणे, भार्इंदर व कल्याणहून अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. चार तासानंतर आग आटोक्यात आली. त्यानंतर चार कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
मृतांची नावे : सारिका अनंत दासरी (४५),निर्मला मधुकर जादूगर (३५), अनुराधा ज्ञानेश्वर निंबोले (२७) व मनोज (२०) अशी मृत कामगारांची नावे आहेत. या प्रकरणी कामगारांच्या सुरक्षेची काळजी न घेणाऱ्या मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.