सुरेश लोखंडे, ठाणेसह्याद्री पर्वताची रांग असलेल्या माळशेज घाटाच्या जंगलपट्ट्यात कमीतकमी चार बिबट्यांचा मुक्त संचार आहे. ते त्यांच्या मस्तीत शिकारीसाठी जंगलात वावरत आहेत. याची जाणीव ठेवून माळशेज घाटात फिरायला किंवा वीकेण्डला येणाऱ्या मुंबई, ठाणे परिसरांतील पर्यटक, तर मुरबाड तालुक्यातील शेतकरी, मेंढपाळ आणि गुराख्यांना या बिबट्यांपासून सावध राहण्याचा इशारा वन खात्याने दिला आहे. दुसरीकडे स्थानिकांनी रेस्क्यू सेंटरची मागणी केली आहे.या बिबट्यांनी शेळ्या, गायी, वासरे आदींवर हल्ला करून त्यांचा जीव घेतला आहे. हल्ल्याच्या सुमारे १० घटना माळशेज घाट परिसरातील मुरबाड तालुक्याच्या गावपाड्यांत नुकत्याच घडल्या आहेत. या हल्ल्यांचा पंचनामा करून आठ ते दहा शेतकरी, मेंढपाळांना नुकसानभरपाई दिल्याचा दावा उपवनसंरक्षक किशोर ठाकरे यांनी लोकमतकडे केला. या जंगलपट्ट्यात वावरणारे बिबटे कोठूनही आणलेले नाही. एवढेच नव्हे, तर जुन्नर किंवा पनवेल परिसरांतील अभयारण्यातून ते चुकून माळशेजच्या जंगलात आलेले नाहीत. ते मूळचे माळशेज पट्ट्यातील आहेत. वाघाचीवाडी हा पाडा त्यासाठी प्रसिद्ध आहे. या वाडीच्या परिसरातील जंगलात बिबटे वास्तव्याला आहेत. २५ ते ३० किलोमीटरच्या अंतरावर ते एकमेकांपासून दूर वास्तव्याला आहेत. सध्या तरी कमीतकमी चार बिबट्यांचे वास्तव्य आढळल्याचे ठाकरे यांनी सांगितले. कल्याण-नगर या राष्ट्रीय महामार्गावरील टोकावडे गावापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील साखरवाडी, मोरोशी, सोनावळे, सिंगापूर, शिरोशी, माळ, सावरणे, हेदवली, खापरी, फांगणे, फांगुळ, गव्हाण, मानिवली, पळू या आदिवासी गावपाड्यांच्या जंगलपट्ट्यात या बिबट्यांचा वावर आहे. ग्रामस्थांनी रात्री उघड्यावर शौचास बसू नये, जंगलात जाताना हातकाठी असावी. शिवाय, एकट्यादुकट्याने जंगलात जाऊ नये. अंधार होण्याआधी घरी परतावे. रात्री घरातून बाहेर पडू नये. रात्रीच्या वेळी हातात बॅटरी व काठी असावी. गावात रात्रभर लाइट असावी इत्यादी मार्गदर्शक सूचना गावकऱ्यांना वन विभागाकडून दिल्या जात आहेत.
माळशेज घाटात चार बिबटे ?
By admin | Published: February 11, 2017 3:53 AM