मुंबई : एसटी महामंडळातील गेल्या सहा वर्षांत बडतर्फ झालेल्या ४ हजार कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्यात येणार आहे. याबाबतीत सेवेत सामावून घेण्यासाठी प्रक्रिया पार पाडली जात असून, पुढील होणाऱ्या बैठकीत निर्णय होईल, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली. एसटी महामंडळातील कर्मचारी कामावर दोन ते चार दिवस किंवा त्यापेक्षा अधिक काळ गैरहजर राहिले तर त्यांना बडतर्फ केले जाते. बडतर्फीची ही कारवाई गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात झाली आहे. सहा वर्षांत जवळपास ६ हजार कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. यात ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या आणि वैद्यकीयदृष्ट्या उत्तम असलेल्या बडतर्फ कर्मचाऱ्यांनाच पुन्हा सेवेत घेण्यात येईल. याबाबत एसटीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल यांनी सांगितले की, सहा वर्षांत ही कारवाई झाली आहे. त्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा विचार होत असून, याबाबत एसटीच्या पुढील होणाऱ्या बोर्डाच्या बैठकीत निर्णय होईल. शिवशाही बस १५ दिवसांत दाखल होणारभाडेतत्त्वावर ५00 शिवशाही बस एसटीच्या ताफ्यात टप्प्याटप्प्यात दाखल होणार आहेत. यातील काही बस येत्या १५ दिवसांत एसटीच्या ताफ्यात दाखल होतील, अशी माहिती देओल यांनी दिली. त्याची प्रक्रिया पार पाडली जात असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)नवी संधी मिळणार?तिकिटांचे पैसे जमा करताना किंवा प्रवाशांकडून पैसे घेताना वाहकांकडून त्यामध्ये आर्थिक अपहार केला जातो. यामध्ये वाहकांना दोषी ठरविण्यात येते. त्यांना होणाऱ्या शिक्षेत काही बदल होतात का याचीही पडताळणी केली जाणार आहे. त्याचप्रमाणे वाहन चालविताना वाहतुकीचे नियम मोडणारे चालकही बडतर्फ होतात. त्यांनाही एकदा संधी देण्याचा विचार केला जात असल्याची माहिती देण्यात आली.
एसटीचे चार हजार बडतर्फ कर्मचारी पुन्हा सेवेत येणार
By admin | Published: March 26, 2016 1:53 AM