मुंबई : भीमा-कोरेगाव येथील घटेनेचे प्रतिसाद मंगळवारी मुंबईच्या लाईफलाईनवरही दिसून आले. हार्बर मार्गावर चेंबूर-गोवंडी स्थानकासह कुर्ला स्थानकात एकूण ४ वेळा रेल रोको करण्यात आला. हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी-मानखुर्द दरम्यान अप आणि डाऊन मार्गाच्या लोकल पूर्णपणे ठप्प होत्या. परिणामी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कुर्ला आणि मानखुर्द/वाशी- पनवेल या मार्गावर विशेष लोकल चालवण्यात आल्या. मध्यसह ट्रान्स हार्बर वरील लोकल सुरळित होत्या. लांब पल्ल्यांच्या मेल-एक्सप्रेस ट्रेन देखील सुरळीत असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसपंर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली.पहिला रेल रोको -चेंबूर : सकाळी ११.४४ मिनिटे- दुपारी १२.०७ मिनिटे, हार्बर मार्गावर गोवंडी स्थानकात सकाळी ११ वाजून ४४ मिनिटांनी पहिला रेल रोको झाला. भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी निषेध व्यक्त करत रेल्वे रुळांवर धाव घेतली. त्यामुळे कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा पूर्णपणे ठप्प होती. रेल्वे पोलिसांसह रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) यांनी एकत्र येत परिस्थिती नियंत्रणात आणली. परिणामी १२.०७ मिनिटांनी चेंबूर स्थानकाहून गोवंडीच्या दिशेने रवाना झाली.दुसरा रेल रोकोगोवंडी : दुपारी १.१५ ते २.०९ आणि २.१२ ते ३.०१दुपारी १.१५ च्या दरम्यान जमावाने पुन्हा गोवंडी येथे रेल रोको केला. या रेल रोकोमुळे अनेक लोकल गाड्या चेंबूर, गोवंडी आणि मानखुर्दच्या दरम्यान पटरीवर उभ्या होत्या. याकाळात एकही लोकल गाडी जागेवरुन हलली नाही. दुपारी २.०९ मिनिटांनी पोलिसांनी निषेध कर्त्यांना रेल्वे रुळावरुन हटवले. मात्र पुन्हा २.१२ मिनिटांनी मोठ्या संख्येने जमाव आल्यामुळे पुन्हा रेल रोको करण्यात आला.तिसरा रेल रोकोचेंबूर : दुपारी १.५३ - ४.४२ वाजतादुपारी २ वाजेच्या सुमारास ३० ते ४० तरूणांचा जमाव चेंबूर स्थानकालगत पटरीत उतरला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी लोकल रोखून त्या लोकलवर निळा झेंडा लावला. या रेल रोकाच्या दरम्यान ५० हून अधिक पोलीस चेंबूर रेल्वे स्थानकावर हजर होते. काहीच वेळात महिला पोलिसांची एक तुकडी स्थानकावर दाखल झाली. जमावाने स्थानक-परिसरात तणाव स्थिती निर्माण केली होती. कोणाच्याही हातात कॅमेरा, मोबाईल दिसला तरी त्यास शिवीगाळ करण्याचे प्रकार यावेळी जमावाने केले.चौथा रेल रोकोकुर्ला : ४.४६ ते ५.२०चेंबूर-गोवंडी स्थानकावरील जमावकर्त्यांना रेल्वे रुळावरुन बाजूला केले. मात्र कुर्ला स्थानकात पुन्हा एकदा घोषणाबाजी देत जमाव रेल्वे रुळावर आला. मात्र स्थानकावर रेल्वे पोलिसांसह आरपीएफ जवानांचा फौजफाटा असल्यामुळे त्यांना रेल्वे रुळापांसून दूर करण्यात आले. अखेर कुर्ला स्थानकातून ५ वाजून २० मिनिटांनी लोकल सीएसएमटीकडे रवाना झाली.रद्द केलेल्या लोकल फे-या : ८६विशेष फे-या : ५२
हार्बर मार्गावर चार वेळा रेल रोको, ८४ लोकल फे-या रद्द, ५२ विशेष फे-या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2018 7:18 PM