नामदेव मोरेनवी मुंबई : मुंबईसह देशभर कांद्याचे दर वाढल्याने विदेशामधून आयात सुरू झाली आहे. इजिप्तवरून चार टन कांदा मंगळवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाला. मालाचा निकृष्ट दर्जा व पावसामुळे ग्राहकांनी पाठ फिरविल्यामुळे कांद्याची विक्री होऊ शकली नाही.देशभर कांदा टंचाई सुरू असल्याने आॅगस्टच्या सुरुवातीला बाजारभाव वाढू लागले आहेत. नवीन पीक येण्यास अवकाश असल्याने बाजारभाव १००पेक्षा जास्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. संभाव्य टंचाई लक्षात घेऊन कांद्याची आयात करण्यावर अनेक व्यापाºयांनी लक्ष दिले होते. इजिप्तवरून मोठ्या प्रमाणात कांदा आयात करण्यात येत आहे. मंगळवारी मुंबई बाजार समितीमध्ये चार टन मालाची आवक झाली आहे; परंतु यामधील बहुतांश माल खराब होता. गडद लाल रंगाच्या या कांद्याकडे ग्राहकांनी पाठ फिरविली. दिवसभरामध्ये कांद्याची विक्रीच झालेली नाही.मुसळधार पावसामुळे बुधवारीही एपीएमसीमध्ये मंदीची स्थिती असल्याने विदेशी कांदा फेकून देण्याची वेळ येणार आहे. सद्यस्थितीमध्ये मार्केटमध्ये आवकही समाधानकारक होत असल्याने विदेशी कांद्याला योग्य भाव मिळणार नसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विदेशातून येणाºया कांद्याला मुंबईमध्ये बाजारभाव मिळत नसल्याने, हा कांदा उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश व दक्षिणेकडील राज्यात विक्रीसाठी पाठविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नसल्याने आयात सुरू ठेवण्यावरही प्रश्नचिन्ह व्यक्त होत आहे. मुंबईमध्ये सोमवारी २११४ टन कांद्याची आवक झाली होती. मंगळवारी मुसळधार पाऊस असल्याने आवक ८१२ टनवर आली आहे. मुंबईमध्ये प्रचंड पाऊस असल्याने ग्राहक एपीएमसीकडे येण्याची शक्यता नसल्याने बुधवारीही आवक कमी होण्याची शक्यता व्यापाºयांनी व्यक्त केली आहे.इजिप्तवरून आलेल्या कांद्याचा रंग गडद लाल आहे. चाळीमध्ये साठवलेल्या राज्यातील कांद्याप्रमाणेच त्याचाही आकार आहे; परंतु आयात होण्यासाठी लागलेला वेळ व खराब हवामान यामुळे कांदा काळा पडू लागला असून, त्याला मुंबईत बाजारभाव मिळण्याची शक्यता धुसर झाली आहे.
इजिप्तमधून चार टन कांदा मुंबईत दाखल, खराब हवामानामुळे कांदा काळा पडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 4:40 AM