ऑनलाइन लोकमत
करमाळा, दि. 1- साडे गाव यात्रेत किरकोळ कारणावरून झालेल्या तलवारीच्या मारहाणीत चौघे जण जबर जखमी झाले आहेत. याबाबत साडे गावच्या माजी सरपंचासह बारा आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साडे गावच्या यात्रेत देवाच्या मिरवणुकीत धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या तलवारीच्या हाणामारीत चौघेजण जबर जखमी झाले आहेत.
पांडुरंग नामदेव ढवळे, विजय पांडुरंग ढवळे, राजेंद्र पांडुरंग ढवळे, संजय भिमराव ढवळे सर्व रा. साडे असे चौघा जबर जखमी झालेल्यांची नावे आहेत . माजी सरपंच दत्तात्रय हरिभाऊ जाधव, जालिंदर हरिभाऊ जाधव, राजेंद्र दत्तात्रय जाधव, गजेंद्र भारत जाधव, संतोष कांतीलाल जाधव, विशाल कांतीलाल जाधव, चंद्रशेखर कांतीलाल जाधव सर्व रा, साडे व इतर पाच अनोळखी इसम असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ही हाणामारी गुरुवारी सायंकाळी सव्वा चार वाजता साडे बस स्टँड वर झाली आहे. याबाबत पांडुरंग नामदेव ढवळे वय ७६ रा. साडे यांनी फिर्याद पोलिसात दिली आहे. कोटलींग देवाची यात्रा साडे येथे चालु आहे. यानिमित्ताने बुधवारी रात्री मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत रात्री च्या वेळी धक्का लागल्याने कुरबुर झाली होती. यावेळी सारवासारव करण्यात आली होती. मात्र छबीना मिरवणुकीत धक्का लागल्याच्या कारणावरूनच पुन्हा दुसर्या दिवशी सायंकाळी पुन्हा हाणामारी झाली. तलवारी, हाॅकी स्टीक, काठी, दगड याच्या सहाय्याने मारहाण झाल्याने चौघेजण जबर जखमी झाले आहेत. याबाबत पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बडाख, हवालदार विजय शेळकांदे, विजय थिटे पुढील तपास करीत आहेत.
या हाणामारीमुळे गाव यात्रेत आयोजित केलेल्या कुस्त्याचा फड रद्द करण्यात आला. त्यामुळे गावकऱ्यांची व कुस्ती शौकिनात नाराजी व्यक्त करण्यात येत होती.