अर्जुनी मोरगाव - वडसा कोहमारा राज्यमार्गावरील मोरगाव टी-पॉइंटवर भरधाव चारचाकीने दुचाकीस्वारांना चिरडल्याची घटना बुधवारच्या सकाळी साडे आठ वाजता दरम्यान घडली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले.दोघांनाही स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार सुजुकी सेलेरियो एम एच ३५ एजी ४२५१ या चारचाकी वाहनाने जनबंधू कुटुंबिय खामखुऱ्यावरून गोंदियाला जात होते.याचवेळी मोरगाव टी-पॉइंटवर महागावकडून समीर माधव नाकाडे (२०),विशाल देविदास नाकाडे (१८) रा.ताडगाव हे एम एच ३५ एक्स ६२१८ या दुचाकीने ताडगावला परत जात होते. दोन्ही वाहने आपापल्या दिशेने भरधाव वेगाने येत होती.राज्यमार्गावरील मोरगाव चौकात दोन्ही वाहनांची धडक झाली.धडक इतकी भीषण होती की दुचाकीला चारचाकी कारने सुमारे ७० फूट पर्यंत फरफटत नेले. या दुर्घटनेत दुचाकीस्वारांची स्थिती गंभीर आहे.दोघांनाही स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले विशाल नाकाडे यांची स्थिती गंभीर असल्याची माहिती प्राप्त आहे.कारमध्ये असलेले जनबंधू कुटुंबिय सुरक्षित आहेत.मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे.दरम्यान चौकामध्ये शेकडोंच्या संख्येने बघ्यांची गर्दी झाली होती. माहिती मिळताच ठाणेदार चंद्रकांत सूर्यवंशी,पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम हे चमूसह घटनास्थळी दाखल झाले. अर्जुनी मोरगाव पोलीस तपास करीत आहेत.