सातारा : ब्राह्मणवाडी (तासगाव, ता. सातारा) येथे १९८७ मध्ये झालेल्या एका खुनातील चार आरोपींची तब्बल २८ वर्षांनी सोमवारी तुरुंगात रवानगी झाली. उच्च न्यायालयाने चौघांना जन्मठेप ठोठावली असून, ते शरण आल्यानंतरच त्यांच्या अपिलावर सुनावणी करण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर सर्वजण सातारा न्यायालयासमोर शरण आले.लालासाहेब सावंत (रा. ब्राह्मणवाडी) यांचा १९८७ मध्ये जबर मारहाणीत मृत्यू झाला होता. या खटल्यात एकूण सात आरोपी होते. ३ मार्च १९९४ रोजी या सर्वांना जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्त केले होते. या निर्णयाविरुद्ध सरकार पक्षातर्फे उच्च न्यायालयात अपील करण्यात आले होते. तेथे एक महिला आरोपी निर्दोष ठरली, तर दोन आरोपींचा मृत्यू झाला. तर, बबन डफळ, प्रकाश सावंत, सुरेश सावंत आणि सुभाष सावंत या चौघांना उच्च न्यायालयाने २५ आॅगस्ट २०१५ रोजी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. याविरुद्ध त्यांनी न्यायालयात दाद मागितली असून, प्रकरण प्रलंबित आहे.सुनावणीपूर्वी आरोपींनी शरण येणे आवश्यक असल्याचा आदेश न्यायालयाने दिला. त्यानुसार सोमवारी हजर झालेल्या चौघांना प्रॉसिक्यूशन स्कॉडचे अविनाश पवार व इतरांनी तिसरे सत्र न्यायाधीश ए. एन. पाटील यांच्यासमोर हजर केले. या चौघांची तुरुंगात रवानगी करण्यात आली.
खुनातील चौघे २८ वर्षांनी तुरुंगात!
By admin | Published: December 01, 2015 1:01 AM