ठाणे : तब्बल दोन हजार कोटींच्या इफे ड्रिन प्रकरणात अमलीपदार्थाच्या तस्करीचा आरोप असलेला शिपिंग कंपनीचा संचालक सुशीलकुमार असिकन्नन अदिद्रविड आणि आणि इफेड्रिनची नायजेरियात विक्री करणारा फेलिक्स ओमोबी ओसिटा या दोघांविरुद्ध ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने चौथे पुरवणी आरोपपत्र ठाणे जिल्हा सत्र न्यायाधीश एच.एच. पटवर्धन यांच्या न्यायालयात दाखल केले. सुमारे २०० पानांचे हे आरोपपत्र असल्याचे सूत्रांनी सांगितले. सुशीलकुमारला गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम शेळके यांच्या पथकाने २२ आॅगस्ट २०१६ रोजी बंगळुरू येथून अटक केली होती. सोलापूरच्या एव्हॉन लाइफ सायन्सेस प्रा.लि. या कंपनीतून नवी मुंबईतील शिपिंग कंपनीचा व्यवस्थापक हरदीपसिंग गिल आणि त्याने एव्हॉनचा सल्लागार पुनीत श्रींगी याच्या मदतीने कंपनीतून ते इफेड्रिन बाहेर काढले. ते नायजेरियन नागरिकांना विकून त्यापासून मेथ इम्पेटामाइन तयार करून त्याची विक्री करायचे. अशा सुमारे ४० कोटी ५० लाखांच्या ९० किलो इफेड्रिनची त्यांनी तस्करी केल्याचा आरोप सुशीलकुमारवर आहे (एक किलोची किंमत ४० ते ४५ लाख रुपये). तर ओसिटा या नायजेरियनला २५ आॅगस्टला अटक केली. त्याच्याकडूनही एक कोटी ३५ लाखांचे इफेड्रिन जप्त केले होते. ओसिटा हा इन्फेटामाइन अमलीपदार्थ तयार करून त्याची विक्री करीत होता. या सर्वच आरोपांचा वरील २०० पानी आरोपपत्रात पुराव्यांसहित उल्लेख केल्याची माहिती पोलिसांनी एनडीपीएस न्यायालयाला दिली. (प्रतिनिधी)
इफे ड्रिनप्रकरणी चौथे आरोपपत्र
By admin | Published: October 25, 2016 2:21 AM