मुंबई : राज्याच्या शासकीय सेवेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर पाल्यास विनाअट अनुकंपा सेवाभरती करावी, या मागणीसाठी राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने १० मार्चला मोर्चाची हाक दिली आहे. भायखळ्यातील राणीबाग मैदान येथून आझाद मैदानापर्यंत निघणाऱ्या मोर्चात हजारो कर्मचारी सामील होण्याचा अंदाज संघटनेने व्यक्त केला आहे.चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न शासन दरबारी प्रलंबित असल्यानेच संघटनेला मोर्चा काढावा लागत असल्याचे संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी सांगितले. पठाण म्हणाले की, चतुर्थ श्रेणीतील महिला कर्मचाऱ्यांना कार्यालयीन सेवेत सन्मानजनक वागणूक मिळत नाही. सोबतच महिला कर्मचाऱ्यांना गणवेश बदलण्यासाठी स्वतंत्र खोलीची व्यवस्थाही शासनाकडे नाही. त्यामुळे सन्मानजनक वागणुकीसोबत महिला कर्मचाऱ्यांना स्वतंत्र खोली व लॉकर्स देण्याची संघटनेची प्रमुख मागणी आहे. दरम्यान, शासकीय निवासस्थाने कर्मचाऱ्यांच्या नावावर करा, पदोन्नतीची संधी ५० टक्के करताना चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची पदे निष्कासित करू नका, महसूल विभागात लिपिकांप्रमाणे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना तलाठी पदावर नियुक्ती द्या, अशा मागण्यांचे निवेदन संघटनेने शासनाला सादर केले आहे.(प्रतिनिधी)
अनुकंपा सेवाभरतीसाठी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मैदानात
By admin | Published: March 04, 2017 1:58 AM