- किनन-रुबेन हत्याप्रकरण
मुंबई : देशभरात खळबळ उडवणाऱ्या व मुंबईच्या कायदा व सुव्यस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या किनन-रुबेन हत्या प्रकरणातील चारही आरोपींना गुरुवारी विशेष महिला न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. तब्बल पाच वर्षे हा खटला चालला.जितेंद्र राणा, सुनील बोध, सतीश दुल्हज आणि दीपक तिवल अशी या आरोपींची नावे आहेत. विशेष महिला न्यायालयाच्या न्या. वृषाली जोशी यांनी या चारही जणांना छेडछाड, कट आणि हत्या या आरोपांतर्गत दोषी ठरवत आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली.विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या खटल्यात पाच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांसह २८ साक्षीदारांची साक्ष न्यायालयापुढेनोंदवली. ‘सरकारने आरोपींसाठी फाशीची शिक्षा मागितलीच नव्हती. त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा व्हावी, अशीच मागणी सरकारने केली होती. न्यायालयाने आमचे म्हणणे मान्य केले,’ असे अॅड. निकम यांनी सांगितले.पाच वर्षांपूर्वी, २० आॅक्टोबर २०११ मध्ये किनन (२४) आणि रुबेन (२९) अंधेरीतील आंबोली परिसरातील एका रेस्टॉरंटमधून त्यांच्या दोन मैत्रिणींसह बाहेर पडले. त्यावेळी काही टपोरींनी मुलींची छेड काढण्यास सुरुवात केली. आपल्या मैत्रिणींची छेड काढण्यात येत आहे, हे बघून किनान व रुबेन वैतागले. त्यांनी त्या तरुणांना रोखले. बाचाबाची झाल्यावर ते तरुण निघून गेले. मात्र पुन्हा थोड्यावेळाने आणखी काही मित्र व चॉपर घेऊन परत आले. एकूण चार जणांनी किनान-रुबेनला मारहाण करून त्यांच्यावर चॉपरवर हल्ला केला. किनानचा मृत्यू त्याच रात्री झाला. तर रुबेनचा मृत्यू ३१ आॅक्टोबर रोजी झाला. पोलिसांनी घटनेच्या दुसऱ्याच दिवशी चारही आरोपींना ताब्यात घेतले. या चारही आरोपींचा माजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांच्याशी संबंध असल्याचेही पुढे पोलीस तपासात उघडकीस आले.या हत्येमुळे देशभरात खळबळ उडाली. मुंबईच्या कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्याशिवाय महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. (प्रतिनिधी)लढाई संपली नाही, ही तर सुरुवात न्यायालयाच्या निर्णयावर मी समाधानी आहे. हा गुन्हा दुर्मिळ नसल्याने आम्ही फाशीच्या शिक्षेची मागणी केलीच नव्हती. या चारही जणांना आजन्म कारावासाची शिक्षा व्हावी, अशीच आमची इच्छा होती. त्यानुसार या चौघांनाही आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मात्र आताशी ही सुरुवात आहे. अजून लढाई लढायची आहे. कारण हे आरोपी शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात जातील. त्यामुळे आणखी वाट पहावी लागेल. मात्र समाजात योग्य तो संदेश गेला आहे.- वालरिन संतोस, किनानचे वडील