मुंबई : राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान यांना चौथा राष्ट्रीय यश चोप्रा पुरस्कार शनिवारी प्रदान करण्यात आला. १० लाख रुपये रोख, सुवर्णकंकण असे पुरस्काराचे स्वरूप आहे.टी. सुब्बरामी रेड्डी फाउंडेशन, अनु आणि शशी रंजन यांच्या सहकार्याने दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. या वेळी राज्यपाल म्हणाले की, शाहरूख खान फक्त त्यांच्या अभिनय कौशल्यामुळे लोकप्रिय नाहीत, तर त्यांच्या सार्वजनिक आणि व्यक्तिगत जीवनातील वर्तणुकीमुळे लोक त्यांच्यावर प्रेम करतात. शाहरूख खान यांच्यामध्ये भारताचे व्यक्तिमत्त्व, संस्कृती आणि चारित्र्य प्रतिबिंबित होते. यश चोप्रा यांनी शाहरूख खान यांच्यातील क्षमता खूप आधी ओळखली. शाहरूख खान यांच्या करिअरला आकार देण्याचे श्रेय यश चोप्रा यांना जाते. सर्वोच्च स्थानावर फार काळ टिकून राहणे अवघड गोष्ट असते, मात्र शाहरूख खान यांचा बॉलीवूडवर २५ वर्षांहून अधिक काळ दबदबा राहिलेला आहे. त्यांनी देशातील शेवटच्या माणसाच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे. त्याला संकटांशी धैर्याने आणि आत्मविश्वासने लढायला शिकवले, असे राज्यपाल म्हणाले. मी आज जो कुणी आहे तो यश चोप्रा यांच्यामुळे आहे. त्यांच्यामुळेच माझे करिअर घडले. मी मुंबईत आलो तेव्हा मला कुटुंब नव्हते; पण आज माझे खूप मोठे कुटुंब आहे आणि ते जगभर पसरले आहे, असे शाहरूख खान यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. (प्रतिनिधी)
चौथा यश चोप्रा स्मृती पुरस्कार शाहरूखला
By admin | Published: February 27, 2017 1:41 AM