मुंबई : ‘आयफोन’सारख्या नामांकित ब्रॅण्डचे उत्पादन करणाऱ्या फॉक्सकॉन या आंतरराष्ट्रीय कंपनीने महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास चक्क नकार दिल्याने राज्य सरकारचा हिरमोड झाला आहे. मुंबईत झालेल्या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहात या कंपनीने सरकारसोबत ५ अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीचा करार केला होता. तैपईस्थित फॉक्सकॉन कंपनी महाराष्ट्र मोठी गुंतवणूक करणार होती. त्यासाठी या कंपनीला सरकारने मुंबईनजिक १५०० एकर जमीन देऊ केली होती. या कंपनीसोबत सामंजस्य करार झाल्यानंतर सरकारने मोठा गाजावाजा केला होता. ५ अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीतून राज्यात ५० हजार जणांना रोजगार मिळेल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.मात्र, जागतिक मंदीमुळे उत्पादनास पुरेसा उठाव नसल्याचे कारण पुढे करत फॉक्सकॉन कंपनीने महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास असमर्थता दर्शविल्याचे समजते. या माहितीस उद्योग खात्यातील सुत्रांनी दुजोरा दिला. (विशेष प्रतिनिधी)सरकारचा दावा फोल-चव्हाणविकासाचे सातत्याने अतिरंजित चित्र रंगवणाऱ्या सरकारने फार गाजावाजा करुन राज्यात फॉक्सकॉन या आंतरराष्ट्रीय कंपनीबरोबर ५ अब्ज डॉलरचा करार झाल्याचा दावा केला होता. परंतु हा दावा फोल ठरला असून सरकारने फॉक्सकॉनच्या गुंतवणुकीचे खरे वास्तव जनतेसमोर मांडावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.
राज्यात गुंतवणुकीस ‘फॉक्सकॉन’चा नकार
By admin | Published: October 28, 2016 1:56 AM