वेदांता आणि फॉक्सकॉन यांचा महत्वाचा प्रकल्प गुजरातला का गेला याचे महत्वाचे कारण आता समोर येऊ लागले आहे. वेदांताला पुण्याची जागा योग्य असल्याचा अहवाल मिळाला होता. गुजरातची जागा प्रकल्पासाठी चांगली नाही असेही त्यांनी नेमलेल्या संस्थेने म्हटले होते. असे असूनही फॉक्सकॉन गुजरातला गेली, याचे कारण आता समोर येऊ लागले आहे.
महाराष्ट्रात गेल्या अडीज वर्षांपासून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये तणातणी होती. नेमके हेच फॉक्सकॉनला नको होते. यासाठी वेदांता समुहाने तळेगावला प्रकल्प टाकण्याचे फायनल करण्यापूर्वी महाराष्ट्र सरकारची भेट घेतली होती. यामध्ये दोन आग्रही विनंत्या करण्यात आल्या होत्या. यात केंद्र सरकारशी ताळमेळ ठेवणे आणि राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळविणे या त्यांच्या दोन अटी होत्या.
महाविकास आघाडीच्या हातून राज्यातील सत्ता गेलेली होती. यानंतर एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांचे संयुक्त सरकार आले होते. २६ जुलैला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांना एक पत्र लिहिले होते. ते आता समोर आले आहे. जनसत्ताने याबाबतची बातमी दिली आहे. या पत्रात शिंदे यांनी वेदांताची समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता. वेदांताकडून झालेल्या दोन मागण्यांवर राज्य सरकार सकारात्मक दिशेने काम करत आहे. तसेच हाय लेव्हल कमिटीने तुम्हाला देऊ केलेल्या इन्सेंटिव्ह पॅकेजला राज्याचे मंत्रिमंडळ मंजुरी देईल असेही म्हटले होते.
याचबरोबर या प्रकल्पाला चांगला पाठिंबा मिळण्यासाठी आम्ही भारत सरकारसोबत चांगला ताळमेळ राखण्याबाबत प्रयत्न करत आहोत, असेही या पत्रात म्हटले आहे. वेदांताच्या अटींवर कंपनीच्या प्रवक्त्याने बोलण्यास नकार दिला. महाराष्ट्रात फॉक्सकॉन अचानक गुजरातला गेल्यामुळे राजकीय वादळ उठले आहे. याचा फटका बसू नये म्हणून शिंदे गट आणि फडणवीस प्रयत्न करत आहेत. त्यांनी मोदींशी बोलून प्रयत्न करण्य़ात येतील असे म्हटले आहे. फॉक्सकॉनच्या सेमिकंडक्टर प्रकल्पामुळे राज्यातील लाखभर तरुणांना रोजगार मिळणार होता. तो हिरावला गेल्याचा आरोप विरधक करत आहेत.