Foxconn Vedanta Deal, NCP vs Eknath Shinde: महाराष्ट्रात येणारा फॉक्सकॉन वेदांता सेमीकंडक्टर प्रोजेक्ट अचानक गुजरातमध्ये स्थलांतरित झाल्याने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे. राज्यात जवळपास निश्चित झालेला आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा हा प्रोजेक्ट राज्य सरकारने मुद्दामच पंतप्रधान मोदी यांच्या गुजरातकडे पाठवला, अशा आशयाची टीका-टिप्पणी विरोधकांकडून केली जात आहे. तशातच, आज या निर्णयाचा आणि शिंदे सरकारचा निषेध म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शिंदे - फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. यावेळी, "स्वतःला ५० खोके, महाराष्ट्रातल्या युवकांना धोके... ईडी सरकार हाय हाय...", अशी जोरदार घोषणाबाजी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली.
ढोकळा न फाफडो, वेदांत प्रोजेक्ट आपडो...
महाराष्ट्रात नियोजित असणारा वेदांत ग्रुप व फॉक्सकॉन कंपनीचा १ लाख ५४ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला. त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांच्या हक्काचा रोजगार शिंदे व फडणवीस सरकारने परराज्यात नेला असा आरोप करत सरकारच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी भवन येथे आंदोलन करण्यात आले. "ढोकळा न फाफडो, वेदांत प्रोजेक्ट आपडो... पन्नास खोके मजेत बोके, महाराष्ट्राला धोके... शिंदे - फडणवीस तुपाशी, महाराष्ट्र उपाशी... गुजरातच्या विकासासाठी कटिबद्ध असलेले महाराष्ट्रद्रोही नेते... स्वतःला ५० खोके, महाराष्ट्रातल्या युवकांना धोके... ईडी सरकार हाय हाय...", अशा विविध घोषणांनी राष्ट्रवादी भवन परिसरात घोषणाबाजी करण्यात आली. युवक काँग्रेसच्या वतीने मंत्रालयाजवळ आंदोलन करण्यात येणार होते, मात्र पोलिसांनी राष्ट्रवादी भवन येथेच युवकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याने त्याच परिसरात जोरदार आंदोलन व घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी युवकांनी फलक दाखवून आणि घोषणा देत परिसर दणाणून सोडला. त्यानंतर युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
दरम्यान, "वेदांत फॉक्सकॉनने महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्ये २० अब्ज डॉलरचा प्रकल्प उभारत असल्याचे समोर आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे हित साधत आहेत की गुजरातचे हित साधत आहेत असा सवाल साऱ्यांच्या मनात आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याची किंमत म्हणूनच वेदांता फॉक्सकॉन महाराष्ट्राबाहेर गेला. मुख्यमंत्री शिंदे गुजरातसमोर लाचार असून त्यामुळेच महाराष्ट्रात वेदांत फॉक्सकॉन त्यांना टिकवता आला नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे. मुख्यमंत्री शिंदे यांची राज्याच्या विकासाबाबतची उदासीन वृत्ती यात दिसून येते. त्यांनी गुजरातला बळी पडून महाराष्ट्राचे आर्थिक नुकसान आणि लाखो इच्छूक तरुणांचे रोजगार बुडवले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातील जनतेला आपल्या बंडाचे समर्थन करण्यात व्यस्त आहेत. रोजगार आणि औद्योगिकीकरणासारख्या विकासाच्या मुद्द्यांवर ते बोलत नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेला तरुणांचे रोजगार घालवल्याबद्दल स्पष्टीकरण द्यावे", असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे म्हणाले.