विशाल शिर्केपुणे : एक सदस्यीय समितीचा निर्णय येण्यापूर्वीच राज्य सरकारने गुटखा, सुगंधित तंबाखू आणि पानमसाला या पदार्थांच्या यादीतून सुगंधित सुपारीला वगळले होते. ‘लोकमत’ने या वृत्ताला वाचा फोडल्यानंतर राज्य सरकारने सुधारित आदेश काढून सुगंधित सुपारीवर सहा महिने निर्बंध घातले आहेत. समितीचा पुढील निर्णय आल्यानंतर त्यानुसार त्यात बदल करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे.राज्य सरकारने २०१२ साली गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूवर बंदी घातली. त्यानंतर पुढील वर्षी सुगंधित आणि स्वादिष्ट सुपारीवरदेखील बंदी घालण्याचा निर्णय घेतला. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) आयुक्तांनी ही बंदी अगदी १९ जुलै २०१७पर्यंत कायम केली होती. या बंदीचा कालावधी वाढविताना त्यातून सुगंधित सुपारीचे नाव वगळण्यात आले होते. तशी अधिसूचना १७ जुलै रोजी प्रसिद्ध केली होती. विशेष म्हणजे, सुगंधित सुपारीचा निर्णय घेण्यासाठी एकसदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अधिसूचनेत म्हटले होते.‘लोकमत’ने या विरोधाभासावर प्रकाश टाकल्यानंतर राज्य सरकारने आता सुगंधित सुपारीवर २० जुलै २०१७पासून पुढील सहा महिने बंदी घातल्याचा सुधारित आदेश काढला असून, त्याची अधिसूचना २२ जुलै रोजी प्रसिद्ध केली आहे. सहा महिन्यांत एक सदस्यीय समितीचा निर्णय येणे अपेक्षित आहे़प्रतिबंधित पदार्थांच्या यादीतून वगळलेल्या यापूर्वीच्या (१७ जुलै २०१७) अधिसूचनेत सुगंधित सुपारीचा साधा उल्लेखही नव्हता. मात्र, २१ जुलैच्या अध्यादेशात सुपारीचे व्यसन कसे घातक आहे, यावर एक पान खर्ची घालण्यात आले आहे. त्यात सुपारी सेवनाच्या भयंकर परिणामाबाबत तज्ज्ञांची मते, अभ्यासाचा उल्लेखही करण्यात आला असून, अगदी या व्यसनाने मायटॉटिक गुणसूत्रात बदल होतो, असे म्हटले आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने या आदेशात, सुपारी आरोग्यास घातक असल्याचे वैज्ञानिक अहवाल व दाखले पाहता त्यावर प्रतिबंध घालणे आवश्यक असल्याचा अभिप्रायही नोंदविला आहे. सुपारी सेवनामुळे व्यसन लागू शकते असा उल्लेखही त्यात आहे.
सुगंधित सुपारीवर घातले निर्बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 5:40 AM