मुंबई : अपंग भावाच्या नावे बँक खाते उघडण्याच्या बहाण्याने मुंबई, ठाणे, नवीमुंबईतील विविध बँकेच्या व्यवस्थापकांवर आपल्या संवादकौशल्याने छाप पाडून लुबाडणाऱ्या महेश बाबुराव देशपांडे उर्फ रेणुकादास व्ही. राव (५९) याला दादर पोलिसांनी अटक केली. म्हाडाचा अधिकारी असल्याचे भासवून तो फसवणूक करुन ती रक्कम घोड्यांच्या शर्यतीवर खर्च करीत असल्याचे चौकशीतून समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की, पदव्यूत्तर शिक्षण घेतलेला देशपांडे हा मुळचा नांदेडचा असून त्याला घोड्यांच्या शर्यतीचे व्यसन होते. याच व्यसनामुळे झालेल्या वादातून त्याच्या पत्नीने घटस्फोट घेतला आहे. काही दिवस त्याने हैदराबाद येथे खासगी शिकवणी घेतली. मात्र रेसचे व्यसन भागविण्यासाठी पैसे अपुरे पडू लागल्याने त्याने बॅँकेतील अधिकाऱ्यांची फसवणूक करुन पैसे उकळण्याची शक्कल लढविली. म्हाडाचा कार्यकारी अधिकारी असल्याची बतावणी करुन तेथे घराचे काम करुन देण्याचे आमिष बँकेच्या व्यवस्थापकांना दाखवी आणि रजिस्टे्रशनच्या नावाखाली पैसे घेऊन तो पसार होत असे. शुक्रवारी वरळी कोळीवाडा येथील बॅक आॅफ महाराष्टच्या बॅक व्यवपस्थापकाला त्याने आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. म्हाडाच्या सदनिकेसाठी रजिस्टे्रशनसाठी त्याच्याकडून १ लाख १० हजाराची मागणी केली. त्याच्यावर संशय आल्याने बॅक व्यवस्थापकाने तत्काळ याची माहिती दादर पोलिसांनी दिली. त्यानुसार दादर पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक शहाजी जाधव, गौतम सोंडे, पोलीस शिपाई महाडीक या पथकाने त्याला अटक केली. देशपांडेला पोलीस खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. अशा प्रकारे त्याने, मुलुंड, दादर, शिवाजी पार्क, भायखळा, वडाळा, डी.बी मार्ग, वाशी, ठाणे परिसरातील विविध बॅँकांतील व्यवस्थापकांना फसविल्याचे सांगितले.
बँक व्यवस्थापकांची फसवणूक
By admin | Published: November 15, 2015 2:06 AM