मुंबई : घरभाड्याच्या बनावट पावत्या दाखवून कर वाचविण्याच्या प्रकाराला आळा बसणार आहे. संबंधित अधिकारी आता याबाबतची कागदपत्रे मागणार आहेत. घरभाड्याचा करार, हाउसिंग को-आॅप. सोसायटीचे पत्र, वीज व पाण्याचे बिल आदी कागदपत्रे मूल्यांकन अधिकारी मागणार आहेत. त्यामुळे बनावट घरभाडे पावत्यांचा खेळ आता अंगलट येऊ शकतो. ‘हाउस रेंट अलाउंस’ घेणारा कर्मचारी या बनावट पावत्यांच्या माध्यमातून ६० टक्के रकमेवरील कर वाचवतात. परंतु, आता आयकर विभाग याबाबत मूळ पावत्यांची विचारणा करणार आहे. एका न्यायाधिकरणाच्या निर्णयानुसार, संबंधित अधिकारी घरभाड्याची कागदपत्रे मागू शकतो. वरिष्ठ कर सल्लागार दिलीप लखानी म्हणाले की, नियमांचे पालन करणे ही आता कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे. घरभाड्याच्या बनावट पावत्या सादर करणाऱ्या कर्मचाऱ्याकडे अनेकदा घरभाड्याची आवश्यक पावती नसते. कदाचित, तो असे कोणतेही भाडे देत नसतो. अनेकदा असा कर्मचारी आपल्या कुटुंबाच्या घरात राहत असतो. बरेचदा वडिलांच्या सह्यांच्या पावत्या तो दाखवितो. (लोकमत न्यूज नेटवर्क)>आता कसून चौकशीमुंबईतील एका कर्मचाऱ्याने तर आपण आईला घरभाडे देत असल्याचे सांगितले होते. काही कर्मचारी नातेवाइकांना घरभाडे देत असल्याचे सांगतात. आता संबंधित अधिकारी उलटतपासणी करू शकतात की, अर्जात दाखविलेल्या पत्त्यावरील प्रॉपर्टीवर खरोखरच भाडे दिले जाते का? त्यामुळे बनावट पावत्या दाखवून कर चुकविणे आता अंगलट येऊ शकते.
घरभाडे पावत्यांची लबाडी अंगलट येणार
By admin | Published: April 06, 2017 5:48 AM