लोकमत न्युज नेटवर्कवैभव गायकर
पनवेल: राज्यभरात महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत असताना या योजनेत गैरकारभार होत असल्याची तक्रार भाजपचे माजी नगरसेवक निलेश बाविस्कर यांनी दि.2 रोजी पनवेलचे तहसीलदार यांना लिहलेल्या पत्रात केली आहे.
खारघर शहरातील महिला पुजा प्रसाद महामुनी यांचा या योजने अंतर्गत अर्ज भरत असताना त्यांच्या आधार कार्डचा गैरवापर करून साताऱ्यामधील जाधव नामक तिर्हाईत व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावे या योजनेचा लाभ घेतला असल्याचे सामोर आले आहे महामुनी यांचा अर्ज वारंवार भरून देखील सबमिट होत नसल्याने त्यांनी भाजपचे खारघर मधील माजी नगरसेवक निलेश बाविस्कर यांच्या जनसंपर्क कार्यालयात याबाबत तक्रार केली. बाविस्कर यांनी याबाबत तपासणी केली असता महामुनी यांच्या नावाने अर्ज अप्रूव्हड झाले असल्याचे त्यांना ऑनलाईन दिसून आले. त्याठिकाणी मोबाईल नंबर मात्र सातारच्या जाधव नामक व्यक्तीचा असल्याचे दिसून आले. याबाबत अधिक माहिति मिळवली असता या व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावे एक नव्हे तब्बल 30 अर्ज भरल्याचे दिसून आले. बाविस्कर यांनी याबाबत त्वरित पनवेल तहसील कार्यालय गाठले आणि झालेल्या प्रकाराबाबत नायब तहसीलदार संजय भालेराव यांना माहिती दिली. यावेळी माजी नगरसेवक निलेश बाविस्कर यांच्यासोबत किरण पाटील,स्वतः तक्रारदार महिला पूजा महामुनी ,कंचंन कुमार बिरला आदी उपस्थित होत्या.
योजनेचे पेमेंट आधार बेस असतो.आधारला कोणता मोबाईल क्रमांक जोडलेला असतो त्यानुसार पेमेंट त्या खात्यात जमा होतो. संबंधित पैसे साताऱ्यातील बँक खात्यात जमा झाले आहेत. याबाबत आम्ही अधिक चौकशी करत आहोत.- संजय भालेराव (नायब तहसीलदार,पनवेल)
संबंधित प्रकार अतिशय धक्कादायक आहे.ज्या व्यक्तीने हे अर्ज भरले त्या व्यक्तीच्या पत्नीच्या नावाने 30 अर्ज भरले असुन काही अर्ज अप्रुव्हड झाले असुन या व्यक्तीने ते पैसे लाटले आहेत.याबाबत आमच्याकडील सर्व पुरावे आम्ही पनवेल तहसील कार्यालयात सादर केले आहेत.पुजा प्रसाद महामुनी यांना त्यांचे पैसे मिळायलाच पाहिजेत.या योजनेचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे.- निलेश बाविस्कर (माजी नगरसेवक ,भाजप खारघर )