नवी मुंबई : भारती विद्यापीठाच्या सांगली येथील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने ३० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी माणिक राजाराम थोरातला अटक केली असून, त्याच्याकडून दहा लाख रुपये हस्तगत करण्यात यश आले आहे.धारावीमध्ये राहणाºया आनंद सेल्व राज यांचा मुलगा जोऐज राज याला एमबीबीएससाठी प्रवेश घ्यायचा होता. चांगल्या महाविद्यालयांमध्ये जाऊन माहिती घेऊन प्रवेश मिळेल का याविषयी विचारणा करण्यात येत होती. भारती विद्यापीठामध्ये चौकशी केली असताना त्यांचा आरोपी माणिक राजाराम थोरात याच्याशी संपर्क आला. थोरात याने सांगलीमधील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. प्रवेशासाठी त्याच्याकडे ३० लाख रुपये दिले होते. वारंवार पाठपुरावा करूनही प्रवेशाविषयी प्रक्रिया होत नसल्याने फसविण्यात येत असल्याची शंका सेल्व राज यांना आली. प्रवेशाविषयीची प्रक्रिया संपल्यानंतरही प्रत्यक्षात प्रवेश मिळाला नसल्याने अखेर फसविण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी सीबीडी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा दाखल केला.सीबीडी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगीता शिंदे अल्फान्सो, सहायक पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत यांनी या गुन्ह्याचा तपास करून माणिक राजाराम थोरात या मूळ पुण्याच्या वारजे भागात राहणाºया इसमास अटक केली आहे. तो भारती विद्यापीठामध्येच काम करतो. त्याच्याकडून प्रवेशासाठी स्वीकारलेल्या ३० लाखांपैकी १० लाख रुपये परत मिळविण्यात यश मिळविले. उर्वरित २० लाख रुपयांचे काय झाले ते कोणाला देण्यात आले याविषयी तपास सुरू आहे.
‘एमबीबीएस’ला प्रवेश देण्याच्या बहाण्याने ३० लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 4:30 AM