औरंगाबाद : राज्यातील भाजपा सरकार दुष्काळाविषयी अजिबात गंभीर नाही. सरकारने आतापर्यंत कोणत्याही ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. उलट जलयुक्त शिवार, कर्ज पुनर्गठन, सावकारांची कर्जमाफी यासारख्या उपाययोजनांच्या नावाखाली निव्वळ फसवेपणा चालू आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी बुधवारी येथे केला. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तत्काळ कर्जमाफी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. तटकरे हे बुधवारपासून दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले आहेत. सरकारने संपूर्ण राज्यात शक्य नसेल, तर किमान मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तरी पूर्ण कर्जमाफी देणे आवश्यक होते. त्याऐवजी सावकारांचे कर्ज माफ केले. मुळात कायद्याप्रमाणे कोणताही सावकार शेतकऱ्यांना कर्जच देऊ शकत नाही, तरीही त्यांचे कर्ज माफ केले. आता जलयुक्त शिवार अभियानाचा डांगोरा पिटला जात आहे. किती काम झाले, याचे मोठमोठे आकडे दिले जात आहेत, परंतु त्यात सत्य दिसत नाही. शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर गुन्हे दाखल करू, असे मुख्यमंत्री म्हणाले होते, पण किती बँका किंवा अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याचे विचारल्यावर सरकारकडे त्याची आकडेवारी नाही, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.आम्ही सत्तेवर असताना शेतकऱ्यांना वेळेवर मदत दिली. आता मात्र तसे होताना दिसत नाही. दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि परीक्षा शुल्क माफ झाले पाहिजे, परंतु अजूनही तसे झालेले नाही, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
दुष्काळी उपायांच्या नावाखाली फसवणूक
By admin | Published: April 28, 2016 5:54 AM