अकोला - राज्य परिवहन महामंडळाच्या अकोला विभागात कार्यरत असलेल्या चालकांना रंगअंधत्वाचा (कलर ब्लाइंडनेस) आजार दाखवून त्यांना बनावट दस्तावेजाद्वारे सुरक्षा रक्षकपदी नियुक्ती देऊन महामंडळाची कोट्यवधी रूपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी एसटीचे तत्कालीन अकोला विभाग नियंत्रक, औरंगाबादचे कामगार अधिकारी, अकोला व वाशिम येथील जिल्हा शल्यचिकित्सक (सीएस), तसेच मानसेवी डॉक्टरांसह ३६ जणांविरुद्ध बुधवारी रात्री खदान पोलिसांनी फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. या प्रकरणात अनेक बड्या अधिकार्यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.राज्य परिवहन महामंडळाच्या अकोला विभागातील अकोला व वाशिम आगारात कार्यरत असलेल्या २६ चालकांना रंगअंधत्वाचा आजार दाखविण्यासाठी अकोला विभागाचे तत्कालीन विभाग नियंत्रक प्रशांत भुसारी (सध्या मुंबई येथे कार्यरत), औरंगाबादचे कामगार अधिकारी लक्ष्मीकांत गवारे, सहायक कर्मचारी अधिकारी रमेश एडके, लिपिक प्रभाकर गोपनारायण, मानसेवी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस.व्ही. तारे, सीएस आर.एच. गिरी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता काळे, वाशिमच्या सीएस डॉ. सुरेखा मेंढे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. व्ही.डी. क्षीरसागर यांनी संगनमताने बनावट दस्तावेज तयार केले. त्यानंतर या २६ चालकांचे बनावट प्रमाणपत्र तयार करून त्यांना राज्य परिवहन महामंडळात सुरक्षा रक्षक पदावर नियुक्ती देण्यात आली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी वरिष्ठ स्तरावरून परिवहन महामंडळाने 'मुंडीवाले' समिती गठित केली. या समितीने अकोल्यात दाखल होऊन विभागातील नऊ आगारांतील सुरक्षा रक्षक पदावर कार्यरत असलेल्या २६ चालकांची वैद्यकीय तपासणी केली, तसेच त्यांच्या रंगअंधत्वाच्या प्रमाणपत्रासह सर्व दस्तावेज जप्त केले. वैद्यकीय तपासणीत २६ पैकी एकाही चालकाला रंगअंधत्व नसल्याचे उघड झाले, तर जिल्हा शल्यचिकित्सकांकडून प्राप्त केलेले रंगअंधत्वाचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे समोर आले. त्यामुळे या प्रकरणाची तक्रार सुरक्षा व दक्षता अधिकारी डी.वाय. डोंगरे यांनी खदान पोलीस ठाण्यात केल्यानंतर पोलिसांनी या बड्या अधिकार्यांसह २६ चालकांवर फसवणूक व कट रचल्याचे गुन्हे दाखल केले आहेत.
एसटीचे विभाग नियंत्रक, सीएस, डॉक्टरांसह ३६ जणांवर फसवणुकीचे गुन्हे
By admin | Published: April 14, 2016 1:38 AM