मुंबई : धावपळीचे आयुष्य, कामाचा ताण, खाण्या-पिण्याच्या अनियमित वेळा या सगळ्याचा परिणाम नकळतपणे आरोग्यावर होत असतो. नियमित आरोग्याची तपासणी न करून घेतल्याने उच्च रक्तदाब होऊनही अनेकांना रक्तदाब असल्याचे माहीतही नसते. त्यामुळेच १७ मे रोजी राज्यातील डॉक्टरांनी त्यांच्या दवाखान्यात, रुग्णालयात रक्तदाबाची मोफत तपासणी करावी, असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनने केले आहे. १७ मे हा दिवस ‘जागतिक उच्चरक्तदाब दिन’ म्हणून साजरा केला जातो. उच्च रक्तदाब प्राथमिक अवस्थेत असताना त्याची लक्षणे दिसून येत नाहीत. अनेक व्यक्ती या नियमित तपासणी करून घेत नाहीत. त्यामुळे त्यांना रक्तदाब आहे की नाही, हेदेखील माहीत नसल्याचे ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. जयेश लेले यांनी सांगितले. उच्चरक्तदाब फार काळ राहिल्यामुळे धमनी काठीण्य ही व्याधी होते. यामुळे धमन्या जाड, कठोर बनतात. यामुळे रक्तप्रवाहाच्या मार्गात अडथळे येतात. यामुळे विविध विकार होऊ शकतात. उच्च रक्तदाबाचे योग्य आणि लवकर निदान व्हावे म्हणून ‘आयएमए’ने ही मोहीम हाती घेतली आहे. ‘आयएमए’चे सदस्य असणाऱ्या ३७ हजार डॉक्टरांना रक्तदाबाची मोफत तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
डॉक्टरांनी करावी मोफत रक्तदाब चाचणी
By admin | Published: May 16, 2016 4:28 AM