ऑनलाइन लोकमतबुलढाणा, दि. 10- मागील तीन दिवसांपासून तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाला लागूनच असलेल्या वडी शिवारातील पाईप फॅक्टरीत बिबट्याचा मुक्त संचार आहे. वनविभागाच्या कर्मचारी पथकाने त्या परिसरात पिंजरा ठेवून पोबारा केल्याने दररोज बिबट्याच्या दर्शनाने नागरिक भयभीत झाले असून, वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.तालुक्यातील वडी, माटोडा, सोनज, दहीगाव आदी गावांच्या मधोमध असणा-या पाईप फॅक्टरी शिवारात मागील तीन दिवसांपासून बिबट्या तळ ठोकून आहे. याबाबत नगरसेवक अनिल सपकाळ यांनी ८ च्या रात्री वनविभागाला माहिती दिली होती. त्याच रात्री ११ वाजता वनविभागाचे कर्मचारी दाखल झाले. मात्र सकाळी पिंजरा ठेवून ते निघून गेले. त्याचदिवशी ९ मेच्या संध्याकाळी पुन्हा बिबट्याचा मुक्त संचार या परिसरात होता. पुन्हा वनविभागाला माहिती देण्यात आली. मात्र त्यांनी १० मेच्या दिवसभर कोणतीही पकडण्यासाठी हालचाल केली नाही. १०च्या संध्याकाळी नगरसेवक अनिल सपकाळ, राहुल इंगळे, फोटोग्राफर गणेश नाफडे, अमित मिरगे यांनी पाईप फॅक्टरी परिसरातील बिबट्याचा मुक्त संचार अनुभवला आणि कॅमेरा बंद केला. मात्र मागील तीन दिवसांत वनविभागाने सदर बिबट्याला पकडण्यासाठी कोणतेच प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झालेत. बिबट्याचा मुक्त संचाराचे फोटो आणि व्हिडीओ असतानाही वनविभाग मात्र याबाबत माहिती देणा-यांना विविध प्रश्न विचारून याकडे दुर्लक्ष करीत आहेत. बिबट्याच्या भीतीने त्रस्त झालेले नागरिक याबाबत वरिष्ठ अधिका-यांनी ठोस कारवाई करण्याची मागणी करीत आहेत.
नांदुरा इथं पाईप फॅक्टरीत बिबट्याचा मुक्तसंचार
By admin | Published: May 10, 2016 9:15 PM