ऑनलाइन लोकमतखामगाव, (जि.बुलडाणा), दि. 27 - येथील उपजिल्हा रुग्णालयात विविध आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांसह, या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी नि:शुल्क अन्नदानाच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे करण्यात येत आहे. एक, दोन दिवस नव्हे तर संपूर्ण सप्ताहभर पोटभर जेवण आणि रुग्णांना दूध आणि फलाहार दिला जात आहे. अतिशय शिस्तबध्दपध्दतीने मोफत अन्नदान वितरीत केल्या जात असल्याने, या अन्नदानाच्या उपक्रमाला संत गजानन महाराज मंदिरातील शिस्तीचा प्रत्यय येत आहे. खामगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात खामगाव तालुक्यासह घाटाखालील सहा तालुक्यातील विविध रुग्णाची उपचारासाठी मोठी गर्दी होते. घाटावरील काही तालुक्यातील देखील अनेक रूग्ण येथे उपचारासाठी येतात. या रुग्णांजवळ त्यांचे नातेवाईक देखभालीसाठी थांबतात. यापैकी बहुतांश रुग्णांच्या नातेवाईकांची खाण्याचीही सोय नसते. अशा नातेवाईकांसाठी खामगाव येथील अग्रसेन भवन मंडळ खामगावच्यावतीने २३ सप्टेंबर २०१६ ते १ आॅक्टोबर या कालावधीत दररोज मोफत जेवण दिल्या जात आहे. दररोज सकाळी ११ ते १ वाजताच्या सुमारास रुग्णांच्या नातेवाईकांना अतिशय शिस्तीत वरण, भात, पोळी, भाजी सोबतच एका मिष्ठानाचे देखील वाटप केल्या जात आहे.
मोफत अन्नदानाला संत गजानन महाराज मंदिरातील शिस्त !
By admin | Published: September 27, 2016 4:50 PM