ऑनलाइन लोकमतपेठ (नाशिक), दि. 15 - आदिवासी, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न केले जात असतानाच नाशिक येथील केअर अॅण्ड रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने पेठ तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. यात ‘एक मूल, पाच वह्या’ याप्रमाणे तालुक्यातील सहा शाळांमधील ६०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
आदिवासी, अतिदुर्गम भागातील मुलांना शैक्षणिक साहित्याअभावी शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये यासाठी केअर अॅण्ड रिसर्च फाउण्डेशन गत तीन वर्षापासून हा उपक्रम राबवत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गढईपाडा, खंबाळे, देवगाव, गोंदे, माध्यमिक विद्यालय, केंगपाडा, जनता विद्यालय, देवगाव आदी शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी गटशिक्षणाधिकारी के.बी. माळवाळ, केअर अॅण्ड रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा.अजय शुक्ला, विस्तार अधिकारी संतोष झोले, केंद्रप्रमुख पुष्पलता गीत, सरपंच थोरात, रमेश थोरात, मुख्याध्यापक लक्ष्मण बाऱ्हे, आर.डी. शिंदे, जी.एम. राऊत, राकेश निकम, दीपक पोतदार, चंद्रशेखर सातपुते, राजेंद्र सावंत, मोहनदास गायकवाड यांच्यासह शिक्षक, ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पेठ तालुक्यातील गढईपाडा येथे मोफत वह्यावाटप करताना एस.एन. झोले, प्रा. अजय शुक्ला, पुष्पलता गीत, जी.एम. राऊत, मोहनदास गायकवाड, लेकराज चौधरी आदी.