परळीः मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही, पण मला कोणतंही पद मिळू नये म्हणून कुणी प्रयत्न करतेय का? पक्ष कोणाच्या मालकीचा नसतो, मला कोअर कमिटीतून मुक्त करा, असं आवाहनच पंकजा मुंडेंनी भाजपा नेतृत्वाकडे केलं आहे. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे बोलत होत्या. जर पदाच्या हव्यासापायी आरोप होत असतील, तर मी कोअर कमिटीतून मुक्ती मागते, अशी आक्रमक भूमिका पंकजा मुंडेंनी मांडली आहे. पंकजा मुंडेंनी नाव न घेता भाजपा नेतृत्वावर निशाणा साधला.
मी कुणाकडेही काही मागणी करणार नाही, माझी कोणाकडून काही अपेक्षा नाही. काही जण म्हणतात, पंकजा मुंडे दबावाचं राजकारण खेळत आहेत, प्रदेशाध्यक्षपद, विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी दबाव आणू पाहत आहेत, पण मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही, असंही पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलेलं आहे.
1 डिसेंबरपूर्वी दररोज टीव्हीवर संजय राऊत दिसायचे. परंतु त्यानंतर सर्वत्र फक्त पंकजा मुंडे दिसू लागली, केवळ माझ्याबाबतची चर्चा सुरू आहे, नाथाभाऊ म्हणाले तसं आम्हाला ढकलत ढकलत दारापर्यंत आणलं, मी पक्ष सोडण्याच्या वावड्या का उठल्या? मी उत्तर देणार नाही, पक्ष उत्तर देईल, पराभवाने खचणारी मी नाही, असं म्हणत पंकजा मुंडेंनीही स्वपक्षीयांनाच घरचा आहेर दिला आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार जाहीर झाले होते, त्यानंतरही एक-एक आमदार जोडण्यासाठी मी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करते आणि तुम्ही म्हणता मी बंड करणार, कोणाविरोधात? माझ्या कुठल्याही अपेक्षा नाहीत. मला वाघीण म्हटलं की विरोधकांच्या पोटात दुखतं, आता तरी मी आमदारही उरले नसल्याचंही खंतही पंकजा मुंडेंनी बोलून दाखवली आहे.