मुंबई : घरगुती गॅसची नोंदणी आता इंटरनेटच्या माध्यमातून करतानाच नोंदणी केलेल्या गॅसच्या पैशाचा भरणा तसेच गॅसच्या वितरणाची स्थिती ही सर्व माहिती आॅनलाइन उपलब्ध होणार आहे. इंडियन आॅइल कॉर्पोरेशन, हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम या कंपन्यांनी ही सुविधा सुरू केली असून, या सेवेचे अनावरण केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते रविवारी मुंबईत झाले. या सेवेमुळे गॅस बुकिंगचे शुल्क आॅनलाइन भरण्यासोबतच बुक केलेल्या गॅसच्या वितरणाच्या स्थितीचा वेध घेणे शक्य होणार आहे. तसेच, गॅस अनुदानासाठी नोंदणी करण्याची सुविधादेखील या कंपन्यांच्या संकेतस्थळावरून उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, पेमेंट बँक व्यवस्थेच्या माध्यमातून गॅसच्या पैशाचा भरणा करण्याची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. गॅस ग्राहकांची संख्या वाढविण्यासाठीही सरकारने प्रयत्न सुरू केले असून, आगामी तीन वर्षांत नवे तब्बल १० कोटी गॅस ग्राहक जोडण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयत्न सरकारी तेल कंपन्यांच्या माध्यमातून होणार आहे. त्याचप्रमाणे नव्या गॅसचे कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांना या कनेक्शनचे पैसे मासिक हप्त्याने (ईएमआय) देण्यात येण्याच्या प्रस्तावावर सरकार विचार करत असल्याची घोषणाही मंत्री प्रधान यांनी केली. इलेक्ट्रॉनिक्स अथवा अन्य वस्तूंची ज्या पद्धतीने ईएमआय पद्धतीने विक्री होते, त्याच धर्तीवर नव्या कनेक्शनसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा विचार आहे. सध्या नव्या कनेक्शनसाठी ३४०० रुपयांचा (विभागनिहाय) खर्च येतो. दोन वर्षांच्या कालावधीत ही रक्कम विभागून घेण्याचा हा प्रस्ताव आहे.
गॅसच्या नोंदणीसाठी आॅनलाइन शुल्क भरण्याची मुभा
By admin | Published: January 25, 2016 2:35 AM