शशी करपे,
वसई- वसई विरार शहराला दररोज आणखी शंभर एमएलडी पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेला हरित लवादाकडून घेण्यात आलेल्या हरकतीसह शोभाताई फडणवीस आणि वनखात्यानेही हरकत मागे घेतली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच या योजनेच्या कामाला सुरुवात होईल. पावसाने मोठा अडथळा आणला नाही तर वसई विरार शहराला येत्या तीन-चार महिन्यातच वाढीव शंभर एमएलडी पाणी पुरवठा सुरु होणार आहे. वाढती लोकसंख्या पाहून सूर्या पाणी पुरवठा योजनेच्या टप्पा क्रमांक ३ मधून वसई विरार शहराला दररोज शंभर एमएलडी पाणी पुरवठा होणार आहे. त्यासाठी २९६ कोटी रुपयांची योजना हाती घेण्यात आली आहे. पालिकेने एमएमआरडीएकडून स्वत: ही योजना चालवायला घेतली आहे. २७ जानेवारी २१०४ रोजी योजनेच्या प्रशासकीय कामाला मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली होती. २८ फेब्रुवारी १६ ला योजनेचे काम पूर्ण होऊन मार्च महिन्यापासून प्रत्यक्ष पाणी पुरवठा सुरु होणार होता. मात्र योजनेतील १९ किलोमीटर मार्गातील जलवाहिनी वनविभागातून जात आहेत. त्यातील १ हजार १०१ झाडे तोडण्यास वनविभागाने हरकत घेतली होती. त्यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पालिकेकडून महाड येथे पर्यायी जागा दिल्यानंतर वनविभागाने डिसेंबर २०१५ मध्ये परवानगी दिली होती. ही परवानगी मिळाली असतानाच याच मार्गातील १० किलोमीटर क्षेत्र वन्यजीव परिक्षेत्रात मोडत असल्याने या संरक्षित क्षेत्रातील ३७७ झाडे तोडण्यास हरित लवादाने आक्षेप घेतला होता. याविरोधात शोभाताई फडणवीस आणि वनविभागाने हरकत घेतल्याने हरित लवादाने यामार्गातील सर्वच झाडे तोडण्यास नकार दिल्याने योजनेचे काम रखडून पडले होते. लवादाने आक्षेप घेतांना हायकोर्टाच नागपूर खंडपीठाच एका निकालाचा संदर्भ घेत योजनेमुळे संरक्षित वनक्षेत्रातील झाडे कापल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होईल, असे म्हटले होते. गेल तीन महिन्यांपासून पुणे येथे हरित लवादापुढे याप्रकरणी सुनावणी सुरु होती. गेल्या आठवड्यात अंतिम सुनावणी पार पडली. शोभाताई फडणवीस, मुख्य वन सचिव आणि डहाणूचे उप वनसंरक्षक याचिकाकर्ते होते. शेवटच्या सुनावणीत फडणवीस यांनी योजनेला हरकत नसल्याचे म्हणणे लवादापुढे मांडले. वन विभागाचे मुख्य सचिव यावेळी गैरहजर होते. तरही डहाणूच्या उप वनसंरक्षकांनी योजनेला हरकत नसल्याचे सांगितले. >योजनेच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले आहेत. काम पूर्ण करण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री सज्ज असून लवादाकडून अंतिम मंजूरी मिळाल्यानंतर युद्धपातळीवर काम पूर्ण करण्यात येईल. पावसाने अडथळा आणला नाही तर तीन महिन्यात वसई विरार शहराला आणखी दररोज शंभर एमएलडी पाणी मिळणार आहे.- हितेंद्र ठाकूर, आमदारसर्व सुनावण्या पूर्ण झाल्या आहेत. प्रतिज्ञापत्र सादर करून घेण्याची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर कामाला सुरुवात करण्यात येईल. या योजनेत आता कुठलाही अडथळा राहिलेला नाही. - सतीश लोखंडे, आयुक्तपालिकेने वनखात्याच्या सर्व अटी शर्ती पूर्ण केल्या आहेत. झाडे कापण्याचे पैसेही वनखात्याला दिलेले आहेत. तमुळे लवादाकडून परवानगी मिळाल्यानंतर कामाला लगेचच सुरुवात केली जाईल.-बी. एम. माचेवाड, शहर अभिंता (पाणी पुरवठा) तीन ते चार महिन्यांत काम होणार पूर्णयाचिकाकर्ते पंधरा दिवसात प्रतिज्ञापत्र लवादापुढे सादर करणार आहेत. त्यानंतर लवादाकडून अधिकृत परवानगी दिली जाणार आहे. या घडामोडीनंतर वसई विरार शहराला आणखी शंभर एमएलडी पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेतील सर्व अडथळे दूर झाले असून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर योजनेच्या कामाला सुरुवात होणार आहे. हे काम येत्या तीन-चार महिन्यात पूर्ण होऊन प्रत्यक्ष पाणी पुरवठा सुरु होणार आहे.