नाशिक, दि. 10- विविध कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या नोकरदार महिलांची स्वच्छतागृहांअभावी परवड होत असल्याची बाब प्रकर्षाने समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या महापालिका प्रशासनाला सार्वजनिक स्वच्छतागृहे महिलांसाठी शहरात उपलब्ध करुन देण्यासाठी जागेची शोधाशोध करावी लागत असल्याने हॉटेल असोसिएशनकडून याबाबत पुढाकार घेण्यात आला आहे. महापालिका व असोसिएशन यांच्या संयुक्तरित्या प्रयत्नांमुळे नाशिकमधील सर्व पंचतारांकित हॉटेलपासून तर साध्या रेस्टॉरंटमधील स्वच्छतागृहे महिलांसाठी मोफत उपलब्ध करुन दिली जाणार आहे. यासाठी महिलांना सदर हॉटेलमधून कुठलीही अन्य सेवा न घेता स्वच्छतागृहांचा वापर करता येणार आहे.
महिलांच्यादृष्टीने तसेच शहराच्या दृष्टीने हे शुभ वर्तमान मानले जात आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून दिल्ली व हैदराबादच्या धर्तीवर नाशिकमधील सर्वच हॉटेलच्या बाहेर ‘महिलांसाठी मोफत स्वच्छतागृहे’ असे फलक लवकरच झळकणार आहे. या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहे.महापालिकेच्या पी बजेटमध्ये दरवर्षी महिलांसांठी मोठ्या प्रमाणावर तरतुद केली जाते. मात्र अद्याप पालिकेकडून अंमलबजावणी होत नाही.