खुदाबक्ष शेखे / भामेर (धुळे)कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारावर योग्य उपचार व इच्छाशक्तीच्या जोरावर राजमोहम्मद खान ईस्माईलखान शिकलगर (रा. चोपडा, जि. जळगाव) यांनी यशस्वीपणे मात करत उर्वरित आयुष्य कॅन्सर रुग्णांसाठी समर्पित केले आहे. राजमोहम्मद हे कॅन्सर रुग्णांना नाशिक, मुंबईपर्यंत स्वत: दवाखान्यात पोहचविण्याचे काम अविरतपणे करीत आहेत. आजतागायत त्यांनी १५८ रुग्णांना मोफत सेवा दिली आहे. पेंटिंगचे काम करणाऱ्या राजमोहम्मद खान शिकलगर (४०) यांना गुटखा व तंबाखूचे व्यसन लागले. २००९ मध्ये त्यांना तोंडाचा कॅन्सर झाल्याचे निदान धुळे येथील कॅन्सरतज्ज्ञ व केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले. त्यामुळे कुटुंबातील सर्व जण हादरले. डॉक्टरांनी शिकलगर यांच्यावर शस्त्रक्रिया केली. पुढील उपचारासाठी मुंबईच्या टाटा हॉस्पिटलमध्ये पाठवले. तेथे १५ दिवस राजमोहम्मद यांच्यावर उपचार सुरू होते.जीवघेण्या आजारातून जर वाचलो तर पुढील आयुष्य कॅन्सर रुग्णांच्या सेवेसाठी अर्पण करीन. इतरांच्या आयुष्याचे नुकसान होऊ देणार नाही, असे ठरवून त्यांनी कॅन्सरग्रस्तांना मार्गदर्शनाची सुरुवात केली. त्यांच्या या कार्यात त्यांची पत्नी शाहीन ईरम यांनी साथ दिली. महिन्यातील १० ते १२ दिवस ते कॅन्सरग्रस्तांसाठी देतात. राजमोहम्मद हे आता आजारातून आता पूर्णपणे बरे झाले आहे. त्यांनी कॅन्सर रुग्ण हेल्प सेंटर व मानवता बहुउद्देशीय संस्था स्थापन केली आहे. समाजातील गरीब व गरजू रुग्णांना ते स्वत: नाशिकच्या क्युरी मानवता कॅन्सर सेंटर वा मुंबईच्या टाटा मेमोरिअल हॉस्पिटल येथे घेऊन जातात. केस पेपर काढण्यापासून ते उपचार सुरू होईपर्यंत सर्व सोपस्कार ते स्वत: करतात.
कॅन्सरमुक्तीनंतर मोफत सेवा!
By admin | Published: January 09, 2017 4:36 AM