पुणे : राज्यातील इयत्ता बारावीपर्यंतच्या मुलींना यापुढे एसटी महामंडळाच्या बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे. यापुर्वी इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या मुलींना सवलत दिली जात होती. तसेच ज्येष्ठ नागरिकांना शिवशाही वातानुकूलित बसमध्ये तिकीट दरात ४५ टक्के सवलत मिळेल. तसेच क्षयरोग व कर्करोगग्रस्त प्रवाशांची सवलत ७५ टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध प्रवास सवलत योजनांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. तसेच एक नवीन योजनाही सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यासाठी तज्ज्ञ समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीचा अहवाल विचारात घेऊन या सुधारणा करण्यात आल्या आहेत. पुर्वी अस्तित्वात असलेल्या सर्व २६ योजना यापुढेही सुरूच राहणार आहेत. अहिल्याबाई होळकर मुलींना मोफत प्रवास योजनेअंतर्गत आतापर्यंत इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत प्रवासाची सवलत दिली जात होती. नवीन सुधारणेनुसार ही सवलत इयत्ता बारावीपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे लाखो मुलींना या सवलतचा फायदा मिळणार आहे. राज्यातील ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना सर्वसाधारण व निम-आराम बसमध्ये तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली जात होती. आता शिवशाही या वातानुकूलित बसमध्येही ज्येष्ठांना ४५ टक्के सवलत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. क्षयरोगग्रस्त व कर्करोगग्रस्त रुग्णांना पुर्वी प्रवासात ५० टक्के सवलत होती. ही सवलत आता ७५ टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे. अंध तसेच अपंग व्यक्तींना देण्यात येणारी ७५ टक्के सवलत कायम ठेवण्यात आली आहे. मात्र, १०० टक्के अपंगत्व किंवा पुर्णपणे परावलंबी असणाऱ्या अपंग व्यक्तीच्या साथीदारालाच पुर्वी ५० टक्के सवलत मिळत होती. त्यामध्ये आता सुधारणा करण्यात आली असून ६५ टक्के किंवा अधिक अपंगत्व असणाऱ्या व्यक्तीच्या साथीदारालाही ५० टक्के सवलत मिळणार आहे. -----------------नवीन सवलत योजना -शालेय शिक्षण विभागाने इयत्ता दहावीमध्ये अनुतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य सेतु अभियान सुरू केले आहे. या योजनेमध्ये १११ प्रशिक्षण केंद्र आहेत. या केंद्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांना निवासस्थान ते प्रशिक्षण केंद्र या प्रवासासाठी मोफत प्रवास सवलत दिली जाणार आहे. या विद्यार्थ्यांना तिकीट दरात ६६.६७ टक्के सवलत दिली मिळणार आहे. ------------