अनिरुद्ध पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कबोर्डी : पहिली ते आठवी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पाहिल्याच दिवशी समारंभपूर्वक नव्याकोऱ्या पाठ्यपुस्तकांचे मोफत वाटप सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत केले जाणार आहे. डहाणू पंचायत समितीच्या शिक्षण विभागा मार्फत ९० टक्के पुस्तकांचे वाटप केंद्रास्तरापर्यंत झाले असून १२ जून पर्यंत प्रत्येक शाळेत पुस्तके पोहचतील. त्यानंतर १५ जून रोजी शाळा प्रवेशाच्या दिवशी विद्यार्थ्यांना ती वाटण्यात येतील अशी माहिती डहाणूचे गट शिक्षणाधिकारी अनिल सोनार यांनी दिली. या वर्षी शाळेच्या पाहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना नवी कोरी पुस्तके उपलब्ध होणार असल्याने खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षणाची प्रत्यक्ष अनुभूती मिळणार आहे. त्या मध्ये जिल्हा परिषद शाळा, शासकीय आश्रमशाळा आणि खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पालघर जिल्हयातील आठ तालुक्यांसाठी शिक्षण विभागाकडून विविध विषयांच्या १६,९२,५७८ पुस्तकांची मागणी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाकडे करण्यात आली होती. त्यापैकी १६,४४,७११ पाठ्यपुस्तके उपलब्ध झाली आहेत अशी माहिती जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांनी दिली. त्या मध्ये डहाणू तालुक्यासाठी ३,७९,५६८ पुस्तकांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी ३,७९,१५७ इतकी प्राप्त झाली आहेत. डहाणू तालुक्यात २६ केंद्रात ४६९ शाळा, १५ शासकीय आश्रमशाळा आणि ४२ प्राथमिक व माध्यमिक शाळा असून त्यामधील विद्यार्थ्यांना ती मोफत वाटण्यात येणार आहेत. केंद्रास्तरपर्यंत पुस्तकांचे वितरण झाले असून १२ जूनपर्यंत प्रत्येक शाळेकडे ती पोहोचतील. शाळेच्या पाहिल्याच दिवशी मुख्याध्यापकांकडून विद्यार्थ्यांना त्यांचे वाटप केले जाणार असल्याचे गट शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले. असे होणार वाटप विक्रमगड-१३८०२५, वाडा-१५३११२, डहाणू-३७९१५७, मोखाडा-७०७३८, जव्हार-७६९६९, वसई-३८३४८०, पालघर-२७६४४७, तलासरी-१६६७५५ एकूण पुस्तकांची संख्या १६,४४,७११ मोफत पाठ्यपुस्तके प्रत्येक केंद्रापर्यंत पोहोचली असून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना ती वाटण्यात येणार आहेत.- अनिल सोनार,गट शिक्षणाधिकारी, डहाणू
पहिल्याच दिवशी मिळणार मोफत पाठ्यपुस्तके
By admin | Published: June 09, 2017 2:58 AM