मुख्यमंत्रीच शब्द फिरवतील, ते माझा शब्द मोडतील, अशी अपेक्षा नव्हती. वाईट वाटते. माझे व्यक्तिमत्व निष्कलंक आहे. यामुळे मला सर्व पक्षांनी मदत करावी, अशी इच्छा होती. पण तसे होताना दिसत नाही. यामुळे मी राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेत आहे. पण ही माघार नाही. तर माझा स्वाभिमान आहे. मी स्वराज्य बांधणीसाठी आता मोकळा झालो आहे. आता मी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहे, माझा दोरा उद्यापासूनच सुरू होत आहे, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
गेल्या काही दिवसांपासून संभाजीराजे छत्रपती यांच्या उमेदवारीवरून राज्यात बरीच चर्चा सुरू होती. संभाजीराजे छत्रपती यांनी आपण राज्यसभेची निवडणूक अपक्षच लढवणार असे ठरवले होते. मात्र, राज्यातील इतर पक्षाकडून मदत न मिळाल्याने, अखेर त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे.
राजे म्हणाले, माला कुणाचाही द्वेश नाही, प्रत्येकाची आपापली भूमिका असते. स्वराज्य बांधण्यासाठी मी आता मोकळा झालो आहे, सज्ज झालो आहे. विस्तापित मावळ्यांना संघटित करण्यासाठी मी मोकळा झालो आहे. मला आठवते, की २००९ ची लोकसभा निवडणूक हरल्यानंतर, मी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता. तेव्हा लोकांचे प्रचंड प्रेम मिळाले.
लोकांची इच्छा होती, की शेतकरी, कामगार, कष्टकरी हा ग्रामीण भागातला समाज, शहरी भागातला युवक यांना संघटित करा. ही मला आज आलेली संधी आहे. मला कुणावरही द्वेश नाही. माझी स्पर्धा माझ्या बरोबर आहे. म्हणून या विस्तापित मावळ्यांना संघटित करण्यासाठी स्वराज्याची स्थापना करून या गोर गरीबांना न्याय देण्यासाठी, अन्याया विरोधात लढणाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे या स्वराज्याच्या माध्यमाने उभा राहणार आहे.
मी राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेत आहे. घोडे बाजार होऊ नये म्हणून मी ही माघार घेत आहे. पण ही माघार नाही. हा माझा स्वाभिमान आहे. माझ्यासाठी खासदारकी महत्वाची नाही. माझ्यासाठी जनता महत्वाची आहे. मी सन्मानाने राहणारा व्यक्ती आहे. मावळ्यांना संघटित करण्यासाठी स्वराज्य सज्ज आहे, असेही संभाजी राजे म्हणाले.