मुंबई : ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर सर्वसामान्य जनतेला त्याचा मोठा फटका बसत आहे. यात शेतकरीही होरपळले असून बाजार समित्यांमध्ये स्विकारण्यात येत नसलेल्या नोटा, सुट्या पैशांची चणचण यामुळे शेतकऱ्यांचीही पंचाईत झाली आहे. शेतकऱ्यांची यामधून सुटका व्हावी आणि भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा यासाठी ५0 किलोपर्यंतचा भाजीपाला एसटीतून विनाशुल्क नेण्यास एसटी महामंडळाने मंजुरी दिली आहे. २४ नोव्हेंबरपर्यंत हा निर्णय लागू राहिल, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली. एसटीतून जास्तीत जास्त प्रत्येक प्रवाशामागे ५0 किलोपर्यंतचा माल वाहून नेला जाऊ शकतो. सध्या ५0 किलोपर्यंतचा माल ५0 किलोमीटरपर्यंत नेण्यासाठी प्रत्येक प्रवाशामागे ६ रुपये आकारण्यात येतात. हा माल नेताना सुट्या पैशांवरुनही वाहक आणि चालकांमध्ये वाद होताना दिसतात. या सर्व कटकटीतून सुटका करण्यासाठी एसटी महामंडळाने ५0 किलोपर्यंतचा कृषीमाल अथवा भाजीपाला वाहून नेण्यासाठी शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय २४ नोव्हेंबरपर्यंत लागू असेल, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली. याबाबतचे आदेशच परिवहन मंत्री आणि एसटीचे अध्यक्ष दिवाकर रावते तसेच व्यवस्थापकीय संचालक रणजिंतसिंह देओल यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. ५00 आणि १000 रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय ८ नोव्हेंबरच्या रात्री घेण्यात आला. या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या दैनंदिन खर्चावर चांगलाच परिणाम होऊ लागला. अनेकांकडे नव्या नोटा असल्या तरी सुटे पैसेच नसल्याने दैनदिन खर्च करायचा कसा असा सवाल उपस्थित झाला. त्यामुळे एसटीतून लांबचा तसेच स्थानिक प्रवास करणेही अनेकांनी टाळले. त्याचा परिणाम ऐन दिवाळीत एसटीच्या भारमानावर झाला आणि १0 नोव्हेंबरपासून भारमान घसरल्याने एसटीला मोठा तोटा होऊ लागला.
भाजीपाल्याची एसटीतून विनाशुल्क वाहतूक
By admin | Published: November 15, 2016 6:32 AM