आॅनलाइन लोकमतकोल्हापूर, दि. 1 - महाराष्ट्राचे संरक्षण करण्यामध्ये पोलिसांची भूमिका महत्त्वाची असून, निवृत्तीनंतरही पोलीस आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यावर महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून 1200 आजारांवर मोफत उपचार करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.येथील पोलीस उद्यानामध्ये उभारलेल्या देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या तिरंग्याचे लोकार्पण फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी दुपारी करण्यात आले. या सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राजयाचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, प्रसिद्ध अभिनेते अक्षय कुमार यांची उपस्थिती होती. फडणवीस म्हणाले, पोलिसांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्याचे काम सुरू आहे. त्यांना घरं बांधून देण्याची योजना राबवण्यात येत आहे. जीवनातील मौल्यवान असे क्षण पोलीस जनतेसाठी देत असतात. अनेक अडचणींचा त्यांना सामना करावा लागतो. महाराष्ट्राचे पोलीस दल हे देशातील सर्वोत्तम दल असून यामुळे 58 टक्के गुन्हे सिद्ध झाले आहेत.चंद्रकांतदादा पाटील आणि विश्वास नांगरे पाटील यांनी या तिरंग्याच्या रूपाने एक चांगली भेट महाराष्ट्राला दिली आहे, असे सांगत फडणवीस यांनी या तिरंग्याने कोल्हापूरच्या सौंदर्यात भर टाकल्याचे सांगितले. या भव्य अशा तिरंग्याकडे पाहिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची, शाहू महाराजांची, क्रांतीकारकांची आठवण होते, परंपरेची जाणीव होते आणि 303 फुटांच्या या ध्वजाकडे मान उंच करून पाहिल्यानंतर उर भरून येतो अशा शब्दात फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यापुढच्या काळात इथल्या अंबाबाईला दर्शनासाठी येणारे या हा झेंडा पाहून आपली देशभक्ती जागवतील असे ते म्हणाले. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, अवकळा आलेल्या पोलीस उद्यानाचे नूतनीकरण करण्यात आले. लोकांच्या सहकार्यातून हा तिरंगा उभारण्यात आला. शाहू महाराजांनी अनेक गोष्टी करून ठेवल्या. परंतु आम्ही नवीन काही केलं नव्हतं. म्हणूनच ही सुरूवात केली. कोल्हापुरात येणारा पर्यटक दोन दिवस इथं राहावा यासाठी प्रयत्न असून इथे फुलपाखरांचे संग्रहालयही करणार असल्याचे त्यांनी घोषित केले. यावेळी पोलीस महासंचालक सतीश माथूर, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, जिल्ह्यातील खासदार, आमदार, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्षांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पोलिस कल्याण निधीसाठी पुणे जनता बँक, उद्योगपती संजय घोडावत, चाटे शिक्षण समूह यांच्यावतीने प्रत्येकी पाच लाखांचे धनादेश यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.अक्षयकुमार हेलिकॉप्टरने तिरंगा फडकवणार होतेआपल्या भाषणात फडणवीस यांनी अक्षयकुमार हे हेलिकॉप्टरमधून हा तिरंगा फडकवणार होते. परंतु वेळेमुळे ते शक्य झाले नसल्याचे सांगितले. अक्षयकुमार हे स्वत: स्टंट करतात. त्यांना आम्ही नाराज करणार नाही. आम्ही पुढे जेव्हा असा तिरंगा तयार करू तेव्हा अक्षयकुमार यांच्या हस्ते हेलिकॉप्टरमधून तिरंगा फडकवण्यात येईल असे ते म्हणाले. मुख्यमंत्री, अक्षयकुमार यांनी दिल्या घोषणामुख्यमंत्री फडणवीस यांनी भाषण सुरू करण्याआधी तीन वेळा ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ अशा घोषणा दिल्या. त्याला उपस्थितांनीही मोठा प्रतिसाद दिला. तर अक्षयकुमार यांनी ‘शिवाजी महाराज की जय’,‘शाहू महाराज की जय’ अशा घोषणा दिल्या. त्यावेळीही उपस्थितांनी जोरदार आवाजात प्रतिसाद दिला. मी तर भाग्यवान - अक्षयकुमारअक्षयकुमार म्हणाला, मी मूळचा पंजाबचा आहे. मात्र आज महाराष्ट्रदिनी मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमवेत बसण्याचा मान मला मिळाला. रात्री दोन वाजता झोपून पुन्हा सकाळी सात वाजता उठून महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री काम करत आहेत त्यांचे अभिनंदन करूया असे आवाहन अक्षयकुमार यांनी केले. प्रत्येक पोलिस मैदानामध्ये असा तिरंगा फडकला पाहिजे अशी अपेक्षा त्याने यावेळी व्यक्त केली. देशातील १२५ कोटी जनता सैनिकांच्या पाठीशी आहे हे दाखवून देण्यासाठी ‘भारत के वीर’ हे अॅप तयार केले असून नागरिकांच्या पाठबळामुळे ते लोकप्रिय आणि उपयुक्त ठरत आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितली ‘भारत के वीर’ ची जन्मकथाअक्षयकुमार याने सुरू केलेल्या ‘भारत के वीर’ या अॅपची जन्मकथा अक्षयकुमार याने सांगितली नाही. मात्र नंतर बोलणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी ती सांगितली. बीबीसीवर दहशतवादी कसे तयार केले जातात हे याचा चित्रफीत दाखवली जात होती. तुम्ही ठार झालात तरी तुमच्या परिवाराची आम्ही काळजी घेऊ याची खात्री या दहशतवाद्यानां दिली जाते. मग दहशतवाद्यांविरोधात लढणाऱ्या सैनिकांना याची कोण खात्री देणार? ही खात्री देण्यासाठीच अक्षयकुमार यांनी हे अॅप तयार केल्याचे फडणवीस यांनी सांगितले आणि सभामंडपामध्ये टाळयांचा कडकडाट झाला. तो आला, त्याने पाहिले आणि जिंकलेहीप्रसिद्ध अभिनेता अक्षयकुमार याला पाहण्यासाठी युवकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे उद्यानामध्ये आणि कार्यक्रमस्थळी तो आल्यानंतर टाळ्या आणि शिट्ट्यांचा पाऊस पडला. त्याने अभिवादनासाठी हात वर केल्यानंतर, भाषणासाठी तो उभा राहिल्यानंतर, त्याच्या सत्कारावेळीही चाहत्यांनी एकच जल्लोष केला. त्याचे मोबाईलवर फोटो काढण्यासाठी तर प्रचंड गर्दी झाली होती.
निवृत्त पोलीस कर्मचारी आणि कुटुंबीयांवर होणार मोफत उपचार- देवेंद्र फडणवीस
By admin | Published: May 01, 2017 6:47 PM